महसूल विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या भूखंडांचा प्रत्यक्ष वापर करताना मोठय़ा प्रमाणात उल्लंघन केले गेल्याचे स्पष्ट होत असून या पाश्र्वभूमीवर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या दोन ते तीन वर्षांत आतापर्यंत दोन हजारहून अधिक भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. आपले वितरण रद्द करण्यात का येऊ नये, अशा आशयाच्या या नोटिशांवर समाधानकारक उत्तर न आल्यास प्रसंगी वितरण रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जाणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील क्रिकेट अकादमीसाठी देण्यात आलेल्या जागेचा खासगी क्लबसाठी वापर सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वच फायलींची तपासणी सुरू केली. प्रत्यक्ष वितरण आदेश आणि सध्या होत असलेला वापर यामध्ये कमालीची तफावत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व संबंधित भूखंडधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या. तब्बल दोन हजारहून अधिक भूखंडधारकांनी अटी व शर्तीचा भंग केल्याचे आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने राजकारणी मंडळींच्या संस्थांचाच समावेश असल्याचे आढळून आले. आतापर्यंत या कोणाकडेही साधी विचारणाही करण्यात आली नव्हती. माजी जिल्हाधिकारी निर्मल देशमुख तसेच विद्यमान जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी या सर्व प्रकरणात सुनावणी घेत भूखंडाचा वापर योग्यरितीने होत आहे किंवा नाही, याची तपासणी सुरू केली. अशाच पद्धतीने अंधेरी पश्चिमेत चार बंगला येथे एका खासगी शिक्षण संस्थेकडून त्यांना वितरित केलेल्या भूखंडाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वितरण रद्द करण्याचा आदेश विद्यमान उपनगर जिल्हाधिकारी देशमुख जारी केला आहे. परंतु अशा आदेशांना राज्य शासनाकडून स्थगिती मिळत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारवाईला अर्थ उरत नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
उपनगरातील दोन हजारहून अधिक भूखंडधारकांना नोटिसा?
महसूल विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या भूखंडांचा प्रत्यक्ष वापर करताना मोठय़ा प्रमाणात उल्लंघन केले गेल्याचे स्पष्ट होत असून या पाश्र्वभूमीवर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या दोन ते तीन वर्षांत आतापर्यंत दोन हजारहून अधिक भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.
First published on: 19-12-2012 at 02:02 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to more than two thousand plotholder in subarban