ऑइलची तस्करी हा मुंबईतील सर्वात मोठा व्यवसाय होता, तो आता पुढे सरकरत सरकत मुंबईशेजारील उरणच्या समुद्र व खाडीकिनाऱ्यापर्यंत पोहचला असून, मागील दोन महिन्यांत तीन घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे फन्रेस ऑइल जप्त करण्यात आले आहे. तसेच या परिसरातील खाडय़ांतून इतरही वस्तूंची तस्करी होत असल्याने उरणमधील समुद्र व खाडीकिनारे हे आता तस्करांचे अड्डे बनले असून, या तस्करांना कोणाचा आश्रय आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बंदर व्यवसायापूर्वी उरण परिसरातील खाडीतून काही प्रमाणात तस्करी होत होती, मात्र जेएनपीटी बंदर व बंदरावर आधारित उद्योगांच्या वाढत्या पसाऱ्याबरोबरच जेएनपीटी बंदरातून रक्तचंदनासह हत्यारांची तस्करी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच्या जोडीलाच आता उरण तालुक्यातील खाडीकिनाऱ्यावरून ऑइलच्या तस्करीचे प्रमाण वाढलेले आहे. मागील आठवडय़ात मोरा परिसरातील समुद्रात एका मचव्यामधून लपवून तस्करी होत असलेले ऑइल पकडण्यात नवी मुंबई क्राइम ब्रँच व मोरा सागरी पोलिसांना यश आले आहे. उरण तालुक्यात मोरा सागरी पोलीस ठाणे, उरण तालुका पोलीस ठाणे व न्हावा शेवा पोलीस ठाणे अशी तीन पोलीस ठाणी आहेत. यामध्ये पाणजे, बेलपाडा, करंजा, खोपटा या खाडय़ांतून ऑइलची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. काही खाडय़ांमधून खाद्यपदार्थ व तेलांचीही तस्करी केली जात आहे. तस्करी होत असलेल्या ठिकाणांची पोलिसांना माहिती असताना तस्करीत घट होण्याऐवजी वाढच होत चाललेली आहे. तस्करी करणाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर मांडवल्या सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी तर पोलिसां बरोबरच पत्रकारांनाही तस्करीच्या बातम्या येऊ नयेत म्हणून तस्करांकडून बांधण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तस्करीतून मिळणाऱ्या पशात वाटा मिळावा याकरिता टोळ्यांचाही शिरकाव उरण परिसरात होऊ लागला असून, तीन ते चार वर्षांपूर्वी बंदरातून काढण्यात येणाऱ्या फन्रेस ऑइलच्या प्रकरणातून एकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याचीही घटना घडलेली आहे. तस्करी ही उरणसाठी नवी गोष्ट नसली, तरी त्यात वाढ होणे ही चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे मत असून, छोटय़ा प्रमाणात असलेल्या तस्करीला वेळीच आळा न घातल्यास उरणमध्ये तस्करांचे राज्य निर्माण होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.