तुम्हाला माहीत आहे का, शहरातील डासांची रोज घनता मोजली जाते? ही घनता तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डासांची स्वतंत्रपणे नोंदविलेली असते. एनाफिलस जातीच्या डासांची मंगळवारची घनता २.८ टक्के होती. डेंग्यू पसरविणाऱ्या इडीस इजिप्त डासाची घनता ४.८ व क्युलेक्स डासाची घनता ८ टक्के होती. डासांच्या घनतेचा असा महिन्याचा हिशेबही ठेवला जातो. मात्र, डासांचा हिशेब व प्रमाण यांचा मेळ पाहता एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातील ‘एक मच्छर आदमी को..’ या संवादाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही!
एकूण २६.६६९ किलोमीटर परीघ असणाऱ्या औरंगाबाद शहरातील विविध भागांमध्ये डासांची घनता मोजण्यासाठी महापालिकेतील दिलीप राठोड दररोज सकाळी साडेसहा ते साडेआठ या कालावधीत एका परीक्षा नळीत डास ओढून घेतात. त्याचे निरीक्षण करतात. एका घरात किती वेळ थांबल्यानंतर परीक्षा नळीत किती डास गोळा झाले, यावरून त्याची घनताही काढतात. हे सर्व काम करण्यासाठी त्यांना केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते अपुरे असल्याचे राठोड सांगतात. डासांविषयीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी महापालिकेच्या दप्तरी नोंदविल्या आहेत. पण शहरातील डास मात्र काही केल्या कमी होत नाहीत.
हिवताप किंवा डेंग्यूचे संशयीत आढळतात, त्या भागात डासांची घनता काढणारी ही एकमेव व्यक्ती पोहोचते, असा दावा महापालिकेकडून केला जातो. कोणत्या भागात किती घरांमध्ये डासांची अशी घनता मोजली जाते, याच्या रीतसर नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. पण सर्वसामान्यपणे असा डास मोजणारा माणूस कोणाच्या घरात आला होता का, असा प्रश्न विचारला की, उत्तर नकारार्थीच येते. डासांच्या या घनतेवर बऱ्याच गोष्टी ठरविल्या जातात. कोणत्या भागात फवारणी करायची, किती वाजता करायची, कोणत्या भागातील पाण्यामध्ये अॅबेट नावाचे द्रावण टाकायचे, हे या घनतेवरून ठरविले जाते.
दहा कर्मचारी आवश्यक
औरंगाबादसारख्या मोठय़ा शहरात असे डास मोजण्यासाठी किमान १० कर्मचाऱ्यांची गरज आहे. शहरात सध्या एक व्यक्ती हे काम करतो. पण तोही या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. त्याला केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरात डास निर्मूलनासाठी गाडीवर बसविलेली दोन फवारणी यंत्रे आहेत. हाताने धूर फवारणी करता येईल, अशी १६ यंत्रे आहेत. एका वॉर्डात दोन अशी त्याची रचना लावण्यात आली आहे. धूर फवारणीसाठी ४८ कर्मचारी आहेत. धूर फवारणी सकाळच्या वेळी व्हावी, असे अपेक्षित असते. मात्र, लोकप्रतिनिधींचा आग्रह एवढा असतो की, दुपारी तीन वाजताही फवारणी करा, असे सांगतात. त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण डास निर्मूलनासाठी काहीतरी सुरू आहे, असे भासविण्यासाठी मग फवारणी उरकली जाते.
या फवारणीसाठी ‘पॅरेथ्रम’ नावाचे द्रावण वापरले जाते. हिवताप विभागाकडून या द्रावणाचा पुरवठा केला जातो. गेल्या मे महिन्यात अडीचशे लिटर ‘पॅरेथ्रम’ महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले, तर डासाने पाण्यात अंडी टाकू नये, यासाठी १०० लिटर अॅबेटही देण्यात आलेले आहे. बीटीआय पावडर आणि बीटीआय लिक्विडचा पुरवठा झाला आहे. विशेष म्हणजे फवारणीसाठी डिझेलही मिळते. तरीदेखील फवारणी कोठे होते, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळे नगरसेवक व जनतेतून फवारणी होत नसल्याचे सांगितले जाते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने फवारणीच्या अनुषंगाने निवेदनही देण्यात आले. विश्रांतीनगर, गणेशनगर, नवनाथनगर, मोतीनगर या भागात फवारणी व्हावी, अशी मागणी अश्फाक सलामी व मधुकर खिल्लारे यांनी केली. नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीतही हा प्रश्न उचलून धरला. उत्तरे दिली जातात. ती देण्यापूर्वी नोंदी मात्र सहीशिक्क्य़ानिशी ठेवल्या जातात. ज्या भागात उद्रेक होईल, त्या भागातच फवारणी करण्याची पद्धत आहे. ते काम नीट सुरू असल्याचा दावा महापालिकेतील अधिकारी करतात.
डबक्याच्या पाण्यात व साचलेल्या पाण्यामध्ये डास अंडी टाकतो. पाणी नसेल तर डासांचे प्रजनन होत नाही. अंडी टाकल्यानंतर आठव्या दिवशी डास चावायला मोकळा असतो. डासजन्माच्याही नोंदी ठेवल्या जातात. त्याचीदेखील घनता काढली जाते. या सगळ्या नोंदी व डासांचे प्रमाण बघता कोणालाही नाना पाटेकरांचा संवाद आठवेल, ‘साला, एक मच्छर..’!