येथे ८ व ९ फेबुवारीस होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनात सर्वाच्या सहभागासाठी ‘एक रुपया, एक मूठ धान्य विद्रोहीसाठी’ अभियानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला.
शोषित, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, कामगार यांच्या सहकार्यातून कुठल्याही सरकारी मदतीशिवाय विद्रोही संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते. परभणीतील विद्रोही संमेलनातून कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद होणार असल्याची भावना अभियानाचे प्रमुख सारंग साळवी यांनी व्यक्त केला. हलगीच्या तालावर, शाहिरीच्या सुरात संमेलनास सहभाग मागणाऱ्या विद्रोहीच्या समितीला नागरिक उत्स्फूर्त मदत करीत आहेत. अभियानासाठी लता साळवी, आनंद तुपसमंदर, सुपरिवर्तन युवा मंचचे युवक परिश्रम घेत आहेत. अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यास कार्याध्यक्ष यशवंत मकरंद, सारंग साळवी, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, संजीव अढागळे, सुनील ढवळे, रमेश ढगे आदी उपस्थित होते.