प्रस्तावित अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा सदोष असून त्यामुळे धर्मश्रद्धा नष्ट होऊन अराजक माजेल, असा आरोप करीत येथील पुरोहित संघाने या कायद्यास विरोध दर्शविला. विधिमंडळातही या कायद्यास शिवसेना विरोध करणार असून त्याबाबत रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती आमदार संजय जाधव यांनी दिली.
गंगा मंगल कार्यालयात जाधव यांच्या उपस्थितीत जिल्हा पुरोहित संघाची बठक झाली. संघाचे अध्यक्ष माधव आजेगावकर, कृष्णाशात्री पळसकर, प्रभाकर नित्रुटकर, बंडूनाना सराफ, त्र्यंबकराव सुगावकर, अनंतराव देशमुख, लक्ष्मीकांत महाराज, डॉ. पंढरीनाथ धोंडगे, भास्करराव लंगोटे, श्रीराम मसलेकर आदी उपस्थित होते. प्रस्तावित अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा सदोष असून अत्यंत तोकडय़ा व पूर्वग्रहदूषित माहितीवर बनवला आहे. यातील अनेक चुकीच्या व त्रोटक स्पष्टीकरणामुळे हा कायदा अनेक धर्मश्रद्धांवर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही, असा सूर बठकीत उमटला. या कायद्याला शिवसेनेचा विरोध असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळात विरोधासाठी रणनीती ठरविली आहे, अशी माहिती आमदार जाधव यांनी दिली.
बठकीस शहरासह विविध तालुक्यांतून ४००वर पुरोहित उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शंकर आजेगावकर यांनी केले. चंदूगुरू ब्रम्हपुरीकर यांनी आभार मानले.