नागनदी स्वच्छता मोहिमेत हातात हात घालून मानवी साखळी करीत संकल्प करणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि काही सामाजिक संघटनांनी आता नागपूरचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी या उपक्रमावर टीका आणि आरोप करीत महापालिकेत सत्तापक्षाला धारेवर धरण्याचा प्रयत्न चालविला आहे.
महाराष्ट्र दिनापासून नागनदी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला त्यावेळी काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन , बहुजन समाज पक्ष आदी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी हातात हात घेत मानवी साखळीत सहभागी होऊन नागनदी स्वच्छ मोहिमेचा संकल्प केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्व नागपुरातील कार्यकर्त्यांनी हिवरी नगर भागातील नागनदीची पाहणी करून महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर टीका केली. नागनदीच्या काठावरील झोपडपट्टीतील मलवाहिन्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये दबल्यामुळे पूर्व नागपुरातील नदीकाठच्या हिवरी नगर, पडोळे नगर, पॅथर नगर, कुंभार टोळी, नंदनवन झोपडपट्टीत मोठय़ा प्रमाणात गटरची समस्या निर्माण झाली आहे.
लोकांच्या घरामध्ये गटारीचे पाणी शिरले आहे. नागनदी स्वच्छतेचा दिखावा निर्माण करण्यापेक्षा महापालिकेने कचऱ्याची आणि शहरातील विविध विकास कामाची विल्हेवाट लावावी अशी मागणी करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महापालिका प्रशासन आणि सत्तापक्ष गंभीर नसल्याची टीका अजय पाटील यांनी केली. नदीच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे लावण्यात आले असून ते साफ करण्यात आले नाही पावसाळ्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या हजारो लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो असेही पाटील म्हणाले.
पावसाळ्यापूर्वी नागनदीजवळ असलेल्या कचऱ्यांची विल्हेवाट लावाली आणि मलवाहिन्या त्वरित खुल्या कराव्या अन्यथा नदीच्या काठावर असलेला कचरा महापालिकेत आणून टाकू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. काँग्रेसच्या काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागनदी स्वच्छता उपक्रमावर टीकास्त्र सोडले असून पावसाळ्यापूर्वी नागनदीच्या काठावर असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली.
मोहीम सुरू होण्यापूर्वी ज्या सामाजिक संघटना नागनदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या त्या संस्थाचे पदाधिकारी आता नदीकडे फिरकतही नाहीत. शहरातील काही प्रसार माध्यमांनी हा उपक्रम उचलून धरताना शहरातील विविध भागात लोकांमध्ये जागृती केली. काही सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नागनदी स्वच्छता करण्याचा संकल्प केल्यानंतर त्यांना महापालिका प्रशासनाने जागा ठरवून दिली. पंधरा दिवस ही मोहीम राबविल्यानंतर सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची गरज असताना आज मात्र त्या संस्थामधील एकही प्रतिनिधी किंवा पदाधिकारी नागनदीकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या विकासासाठी एखाद्या राजकीय पक्षाने चांगला उपक्रम सुरू केला तर त्याला विरोध करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा  असली तर नागपूरच्या वैभव असलेल्या या उपक्रमात सर्वानी सहकार्य करण्याची गरज आहे.
 केवळ या मोहिमेत केवळ फोटोसाठी सहभागी असल्याचा देखावा निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्षात जर उपक्रमात सहभागी झाला तर नागनदी स्वच्छता मोहीम यशस्वी होईल हे तितकेच खरे.