घरकुलासाठी दारिद्रय़रेषेच्या कार्डचा गैरवापर केल्याप्रकरणी कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दीपक चाटे, रामेश्वर तांडाच्या सरपंच संगीता चव्हाण, ग्रामसेवक के. जी. खंदारे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा आदेश कळमनुरी प्रथम श्रेणी न्यायालयाने आखाडा बाळापूर पोलिसांना दिला.
साहेबराव अमृतराव राठोड (रामेश्वरतांडा) यांचे बीपीएल कार्ड बेकायदा लाभ मिळवून देण्यासाठी वापरले गेल्याचे हे प्रकरण आहे. फिर्यादी राठोड हे बीपीएलधारक असून त्यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत २०११-१२मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यांचा बीपीएल कार्ड क्रमांक ३५५१ आहे. परंतु आपल्या कार्डचा साहेबराव बळीराम जाधव यांच्या नावे बेकायदा वापर केल्याचा आरोप फिर्यादीने केला. जाधव यांनी बीपीएल कार्डधारक नसताना सरपंच चव्हाण, ग्रामसेवक खंदारे यांच्याशी संगनमत करून इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मिळविण्यास प्रस्ताव दाखल केला.
त्यावर गटविकास अधिकारी चाटे, सरपंच चव्हाण, ग्रामसेवक खंदारे, पं.स.चे कनिष्ठ अभियंता भारत सातव, तंटामुक्ती अध्यक्ष तलुरा जाधव, सरपंचाचे पती गणेश चव्हाण, सरपंचाचा भाऊ ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव, दिलीप जाधव, शंकर चव्हाण व इतरांनी संगनमत करून बनावट दस्तऐवज तयार करून बनावट पंचनामा, बनावट अहवाल तयार करून साहेबराव जाधव यांना घरकुल मंजूर केले. याचा अग्रीम हप्ता २५ हजार गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने दिल्याची तक्रार राठोड यांनी केली.
राठोड यांनी अ‍ॅड. पंजाब चव्हाण यांच्यामार्फत आरोपीविरुद्ध कळमनुरीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात फिर्याद दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आखाडा बाळापूर पोलिसांना आदेश दिले.