मुंडले एज्युकेशनल ट्रस्टच्या सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स (सिस्फा)च्या वतीने  एकरात्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. निसर्गाचे ऋतूचक्र ठरलेलेले आहे. तीव्रतेच्या कमी-अधिकतेमुळे क्वचित उशीर होत असेल. मात्र, क्रमात बदल होत नाही. निसर्ग हाच गुरू मानणाऱ्या कलावंतांच्या व्यक्ततेलाही हाच नियम लागू आहे. चित्रकारांची अभिव्यक्ती-निर्मिती-सादरीकरणाच्या प्रक्रियांमध्ये बदल असला तरी रूपाकार एकच असतो.
चित्रकारांनी निर्मिती थांबवली नाही, थांबवणे शक्य नाही. नव्या परिमाणासाठी उलट मंदीचे चटके सहन करीतही शक्य तेवढय़ा नव्या मिती शोधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. जगभर ही प्रक्रिया सुरू होती. निर्मिती प्रक्रिया गुप्त ठेवणाऱ्या चित्रकारांनी आयामांची देवाणघेवाण असे गोजिरे रूप देऊन कार्यशाळेच्या नावाने गुपिते खुली केली. दीर्घकाळ चालणाऱ्या कार्यशाळा माध्यमांमुळे ‘एकदिवसीय झाल्या. अनेक शैक्षणिक संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठाने, प्रायोगिक संस्थांनी सामूहिक व्यक्ततेच्यासाठी चळवळीला आपले केले. दिग्गजांच्या प्रतिसादाने नवा आयाम आला. अशा कार्यशाळांच्या आयोजनातून काय साधते?  याच उत्तर प्रत्येकाने शोधायचे. अमूर्त चित्रही आनंद देतातच. भिंतीवरून काढले तर भिंत ओकी-बोकी वाटतेच. ऋतूचक्र कोणतीच अपेक्षा किंवा अंतिमाचा विचार करून कृती करीत नाही.
नागपुरात अशाच एकरात्रीय कार्यशाळेचे आयोजन सिस्फाने केले. जुन्या दिग्गजांसोबत नव्या तरुणाईने एक रात्र कलानिर्मिती करावी, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  अपेक्षेशिवाय नवी पालवी जुन्या पानांशी, फांदीशी सलगी ठेवतातच. कलाशिक्षण घेणारे तरुण एका रात्री कलेचे शिक्षण घेतात तरी काय? देणारेही देतात तरी काय? कलाशिक्षण घ्यायचेच कशाला? या प्रश्नांची उत्तरे या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळतात.
 कार्यशाळेत या क्षेत्रात पहिले पाऊल स्थिरावणारे ते थरथरणारी पावले टाकणारे एकत्र आणली होती. प्रत्येकाचा अनुभव निराळा, भाव आगळा होता. जनांचे चित्रण करणारे तर काही सृजन चितारणारे होते. दगड-मातीतील नको ते काढून टाकणारे, मातीच्या गोळ्याला चाकावर हवे तसे फिरवणारे होते. रात्रभर कॅनव्हासशी बोलणारे, तर काही अध्र्या तासात संवाद साधणारे अभिव्यक्ते होते. आपला हुंकार साकारणारे वेडे पीर होते. गप्पा, चहा, जेवण करीत एक-दुसऱ्याला काही तरी सांगणारे व ऐकणारे रंगपेटी उधळीत होते. चांदण्या रात्री  छोटासा कॅनव्हास रंगवीत होते. संग्रह, प्रदर्शने सादर करून व्यावसायिक व सामाजिक भान जपणाऱ्या संस्थाही कलात्मक प्रबोधनासाठी हाच मार्ग स्वीकारताना दिसतात.
कधी, कुठे, कुणाला काय गवसेल माहीत नाही. कलेने, निसर्गाने ठरवलेय. सर्जन आणि उत्सर्जन, लय आणि प्रलय, तोल आणि विषमतोल, आकृती आणि पुनरावृत्ती, आकार आणि निराकार, प्राधान्य आणि गौणत्व निसर्गाने दिले. या व्याकरणाचा उपयोग करणे आपले काम आहे. व्यक्तिगत व संस्थापक पातळीवर अशा उपक्रमांची गरज आहे. ‘स्कल्पचर पार्क, रेसिडेन्सी, वर्कशॉप, आर्टसमिट’ संकल्पना यातून आली असावी. शहराच्या वैभवासाठी ही नवी मिती स्वीकारायला हवी. नृत्य-नाटय़-काव्य सोबतीला फ्युजन म्हणून येईल. काहीतरी नक्कीच साधेल. वृक्षाला फांदी, फांदीला पारंब्या जड होत नाही, वैभव वाढवतात. डेरेदार होतात. वसंतात हे रूप छान दिसते. पानांची सळसळ कानभर होते. सिस्फाच्या वतीने ५ फेब्रुवारीपर्यंत आयोजित ‘हॉट मून’ या कलाप्रदर्शनाचा  लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी केले.