26 September 2020

News Flash

मुलाखतीने उलगडला पंकजचा संघर्ष

कब्बडीचे मैदान गाजवून आता पोलीस सेवेत दाखल झालेला नगरच्या मातीतील पंकज शिरसाट या भारतीय कब्बडी संघाच्या माजी कर्णधाराने रविवारी मुलाखतीचे मैदानही गाजवले. आपल्याच मातीतील शालेय

| December 12, 2012 01:31 am

कब्बडीचे मैदान गाजवून आता पोलीस सेवेत दाखल झालेला नगरच्या मातीतील पंकज शिरसाट या भारतीय कब्बडी संघाच्या माजी कर्णधाराने रविवारी मुलाखतीचे मैदानही गाजवले. आपल्याच मातीतील शालेय विद्यार्थ्यांसमोर त्याने आपल्या संघर्षांतून घडवलेल्या करिअरचे मर्म उलगडले व खेळत रहा, संघर्ष करत रहा यश तुमच्याबरोबर येईलच येईल, असा सल्लाही दिला.
सृजन शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन संस्था, तसेच के स्क्वेअर अ‍ॅकडमी यांनी शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांची मुलाखतमाला सुरू केली आहे. त्याअंतर्गत रविवारी पंकजची मुलाखत झाली. कौत्सुभ केळकर यांनी पंकजला बोलते केले. त्याने नंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
कब्बडी खेळायला लागलो व ती कधी आवडायला लागली ते समजलेच नाही. तिचा ध्यास इतका पराकोटीचा होता की रात्री-अपरात्री कब्बडीतील चालींचा, हालचालींचा सराव खोलीत करायचो. त्यातच उत्तम प्रशिक्षक मिळाले. त्यामुळे आपोआप घडत गेलो. खेळातील डावपेच रोजच्या जगण्यात देखील उपयोगी पडतात. चांगला खेळाडू हा कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, कारण त्याला तसा सरावच झालेला असतो, असे पंकजने सांगितले.
कब्बडीने अनेक पुरस्कार दिले. अर्जुन पुरस्कार मिळाला. कब्बडीमुळेच आता पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अफाट मेहनतीने आपले कौशल्य धारदार केले तर तुम्हाला कोणीही कुठेही अडवू शकत नाही, असे आपल्या अनुभवाचे बोलही पंकजने विद्यार्थ्यांना ऐकवले. खेळ हेही करिअर होऊ शकते, मात्र त्यासाठी जो खेळ आपण खेळतो त्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे, असे तो म्हणाला. ध्यास घेतला तर सगळ्या गोष्टी सहजसाध्य आहेत, असे त्याने सांगितले.
कब्बडीविषयक, तसेच अन्य अनेक प्रश्नांना पंकजने सविस्तर उत्तरे दिली. सृजन संस्थेचे महेश घोडके यांनी प्रास्ताविक केले. तेजश्री धंगेकर यांनी स्वागत केले. भावना धर्माधिकारी यांनी आभार मानले. या मालेतील पुढील मुलाखत १३ जानेवारी २०१३ ला शहर बँकेच्याच सभागृहात नामवंत वास्तूआरेखक नंदकिशोर घोडके यांची होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 1:31 am

Web Title: pankaj struggle is open by an interview
टॅग Interview
Next Stories
1 मिळकत कराच्या थकबाकीने ओलांडला हजार कोटीचा टप्पा
2 फग्र्युसनच्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला,तरुणास अटक
3 पुणेकर उद्या पाण्याशिवाय
Just Now!
X