वसई पूर्वेकडील वसंतनगरीत असलेल्या शेठ विद्यामंदिर शाळेने शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच शाळा सत्राच्या वेळा बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू झाले असून त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बिघडले आहे. शाळेच्या प्राचार्य शिखा गांगुली यांनी मात्र शाळेच्या काही अडचणी आहेत. त्यासाठी हा मार्ग अवलंबिल्याचे सांगितले. आजपर्यंत सकाळी महाराष्ट्र बोर्डाचे वर्ग घेतले जात असत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हे वर्ग दुपारच्या सत्रात घेण्याचा निर्णय शाळेने घेतला. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी संयुक्त वर्षांचे खासगी क्लासेस दुपारच्या सत्रात सुरू केले. आता त्यांना खासगी शिकवण्यांच्या वर्गाना उपस्थित राहता येणार नाही आणि त्यांनी भरलेले पैसे वाया जातील व दुपारी अभ्यास करण्यास वेळही मिळणार नाही. यासाठी विद्यार्थी व पालकांनी गेल्या आठवडय़ापासून आंदोलन छेडले आहे. शाळेवर मोर्चाही नेण्यात आला. यासंदर्भात येत्या १९ तारखेला पालक-प्रशासनाची बैठक होणार आहे. या बैठकीत शाळा प्रशासनाने निर्णय न बदलल्यास व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.