राष्ट्रीय परिसंवादातील मत
भारताच्या सीमारेषेवर होणाऱ्या कारवाया, बनावट चलनी नोटा वापरात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न, मादक पदार्थाचा पुरवठा, सायबर सुरक्षा अशी काही प्रमुख आव्हाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर दहशतवाद्यांनी उभी केली असल्याने ही सुरक्षा भक्कम ठेवण्यासाठी देशातील नागरिकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुंबईचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधीक्षक डॉ. अतुल फुलझेले यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळेतंर्गत असलेल्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे भवितव्य: आव्हान आणि प्रतिसाद’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम होते. यावेळी मंचावर पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. अरूण दळवी, प्रा. आर. एच. गुप्ता, प्रा. टी. आर. बोरसे, अधिष्ठाता प्राचार्य ए. एस. पैठणे उपस्थित होते.
डॉ. फुलझेले यांनी यावेळी देशातील अंतर्गत सुरक्षेवर प्रकाश टाकला. गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ले वाढले आहेत. मुंबईवरील हल्ला, उत्तर-पूर्व राज्यांमधील कारवाया, नक्षलवाद्यांचे हल्ले यामध्ये असंख्य लोकांचा बळी गेला आहे. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा ही जबाबदारी केवळ पोलीस, लष्कर अथवा निमलष्करी दलावर आहे असे समजून चालणार नाही. नागरिकांनी देखील या जबाबदारीसाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नक्षलवाद्यांच्या कारवाया १६ राज्यांमध्ये वाढल्या आहेत. जेव्हा देशांतर्गत हल्ला होतो. तेव्हा कोणती संघटना त्यात सहभागी आहे हे हल्ल्यावरून लक्षात येते. धार्मिक कट्टरतावाद, अनधिकृत स्थलांतरण, प्रादेशिक व भाषिकवाद, विशेष आर्थिक क्षेत्र, वाढती आर्थिक विषमता यांमुळे काही कारवाया वाढीस लागण्यास झाला आहे. आदिवासी भागात कंत्राटदारांकडून होत असलेले लोकांचे शोषण पाहून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ात प्रवेश केला. तेथील स्थानिक तरुणांना आपल्यात सहभागी करून घेतले. विकासाचा अभाव हे नक्षलवादी कारवायांचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट करतानाच डॉ. फुलझेले यांनी भारताच्या सीमारेषेवर असलेले अफगाणिस्तान, बांगला देश, चीन, भुतान, म्यानमार, नेपाळ आणि पाकीस्तान या देशांकडून होत असलेल्या कारवायांकडेही उपस्थितांचे लक्ष वेधले.