कर्जाची परतफेड करण्यासाठी जामीनदाराने दिलेले धनादेश वटले नाहीत म्हणून न्यायालयाने त्यास तीन महिने कैद व ५ लाख ४० हजार रुपये संबंधित संस्थेला देण्याचा निकाल आज दिला. कर्जदार नामानिराळा राहिला, मात्र जामीनदारालाच तुरुंगाची हवा खावी लागण्याची आफत ओढवली.
श्यामराव पांडुरंग जाधव (रा. सुरेगाव ता. कोपरगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या जामीनदाराचे तर विक्रम चंद्रभान जाधव (रा. कारवाडी, सिन्नर) असे कर्जदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील संभाजीराजे थोरात पतसंस्थेकडून विक्रम जाधव यांनी वेगवेगळी दोन कर्जे घेतली होती. त्या कर्जास श्यामराव जाधव जामीनदार होते. वेळेत कर्ज फेडले नाही म्हणून संस्थेने दोघांकडेही तगादा लावला होता. अखेर जामीनदार शाम जाधव यांनी परतफेडीसाठी संस्थेला दोन धनादेश दिले. मात्र खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश न वटता परत आले त्यावर संस्थेने येथील न्यायालयाकडे धाव घेतली.
सुनावणीअंती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. राय यांनी याप्रकरणी आज निर्णय दिला. त्यानुसार जाधव यांना तीन महिने कैद तसेच एका कर्जप्रकरणी दोन लाख वीस हजार व दुस-या कर्जप्रकरणी तीन लाख वीस हजार असे पाच लाख चाळीस हजार रुपये थोरात पतसंस्थेकडे जमा करण्यास फर्मावले आहे.