साडेपंधरा लाखांची मदत आमटे कुटुंबीयांकडे सुपूर्द
हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्पामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी ठाण्यातील प्रेरणा कला संस्था व कोकणकला अकादमी संस्थेच्या वतीने ‘द्वंद्व’ नाटकाचे १२ विक्रमी प्रयोग सादर करण्यात आले. संस्थेने २००९ मध्ये सादर केलेल्या ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकांच्या ११ प्रयोगांचा विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला. या प्रयोगातून जमा झालेला सुमारे १५ लाख ५५ हजारांचा निधी संस्थेच्या वतीने आमटे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत लोकबिरादरी प्रकल्पास मदत उभारण्यासाठी कोकण कला अकादमीच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मिनी थिएटरमध्ये नुकताच हा विशेष कार्यक्रम पार पडला. डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, लेखक प्रा. प्रदीप ढवळे, संस्थेचे अध्यक्ष संजय केळकर, डॉ. तात्याराव लहाने  यांनी नाटय़प्रयोगास उपस्थिती लावली होती. महात्मा गांधीच्या जीवनाचा वेध घेणारे हे नाटक असून महात्मा गांधी हे बाबा आमटे यांचे प्रेरणास्थान होते. त्यामुळेच हे नाटक प्रा. ढवळ यांनी सादर करण्याचे ठरवले होते.  दोन दिवस, ३८ तास ४० मिनिटे, १२ प्रयोग असा विक्रम या कलाकारांनी साधला. शनिवारी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेले हे प्रयोग दीडशेहून अधिक कलाकारांच्या सहभागाने अखंड सुरू होते. गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा गावामध्ये माडिया गोंड अदिवासींच्या कल्याणासाठी बाबा आमटेंनी १९७२ मध्ये लोकबिरादरी उपक्रमाची सुरुवात झाली. अठरा विशे दारिद्रय़ आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे अनास्था असलेल्या या भागात आदिवासींच्या उपचारासाठी १९८० मध्ये रुग्णालयाची उभारणी केली. काळाबरोबर रुग्णांची संख्या वाढली, रुग्णालयाची इमारत कमी पडू लागली. नव्या रुग्णालयाच्या इमारत प्रकल्पासाठी ५० खाटांचे सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाची उभारणी सुरू झाली आहे. ५ कोटींच्या या रुग्णालयासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून मदत पोहचवली जात आहे, त्यासाठी ठाण्यातील संस्थेचा हा प्रयत्न असल्याची माहिती प्रा. ढवळ यांनी सांगितले.