योग्य उपचाराची साधने व तज्ज्ञांची उपलब्धता यामुळे विदर्भासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेशातील मूत्रपिंडविकाराचे तीन लाख रुग्ण नागपुरात धाव घेत आहेत. माफक दरात उपचार आणि डॉक्टरांची सेवाभाव यामुळे मूत्रपिंडविकाराचे रुग्ण नागपुरात येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या रुग्णांपैकी फक्त २२.५ टक्के रुग्ण डायलिसिस करतात, तर फक्त २.५ टक्के रुग्णच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मूत्रपिंडाच्या आजारावर सुपर स्पेशालिटी, शुअरटेक, ऑरेंज सिटी रुग्णालय, केअर आदी मोजक्याच रुग्णालयात उपचाराच्या सोयी उपलब्ध आहेत. सुपर स्पेशालिटीमध्ये डायलिसिस करण्यासाठी एक हजार ते पंधराशे रुपये, तर खासगी रुग्णालयात २ ते ५ हजार रुपये एका वेळचा खर्च येतो. मूत्रपिंड खराब झालेल्या रुग्णास आठवडय़ातून किमान एकदा तरी डायलिसिस करावे लागते. दोन्ही मूत्रपिंड खराब असेल तर किमान एक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. यावरून या रुग्णांना कोणत्या परिस्थितीतून सामोरे जावे लागत असेल, याची कल्पना येते.
विदर्भात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्र उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना नागपूरशिवाय पर्याय नाही. मूत्रपिंडाचे वाढते रुग्ण बघता विदर्भातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्र बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. खासदार व आमदारांनी त्यांच्या विकास निधीतून ते उपलब्ध करून दिले तर काही प्रमाणात या रुग्णांना दिलासा मिळू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले. या आजारावरील उपचार अत्यंत महागडे असल्याने सर्वसामान्य गरीब रुग्ण योग्य उपचार करू शकत नाही. मूत्रपिंडच निकामी असलेल्या रुग्णांना मूत्रपिंड देणारा व्यक्ती भेटणे आवश्यक आहे, अशी माहिती मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. एस.जे.आचार्य यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ४ ते ५ लाख रुपये खर्च येते. यानंतरही दर महिन्याला चार ते दहा हजार रुपयापर्यंत औषधोपचाराचा खर्च येतोच. सामान्य नागरिकांना एवढा खर्च करणे शक्य नाही. त्यामूळे मूत्रपिंड दानदात्याला शासनाने काही सवलती दिल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
विदर्भात मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेशात अंदाजे तीन लाख नागरिक मूत्रपिंडविकाराने आजारी आहेत. यातील ३० हजार नागरिकच योग्य उपचार करू शकतात. शासन मूत्रपिंडाच्या आजाराविषयी उदासीन असून जनजागृती केल्यास या आजारावर काही प्रमाणात अंकुश लावता येऊ शकतो. किडनी फाऊंडेशन त्या दिशेने प्रयत्न करत असल्याची माहिती सुपर स्पेशालिटीतील माजी मूत्रपिंड विभाग प्रमुख डॉ. वीरेश गुप्ता यांनी दिली.

मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक
दहा लाख लोकांमधील १०० लोक मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे संशोधन नॅशनल किडनी फाऊंडेशन ऑफ इंडियाने केले आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी जवळपास ९० हजार लोकांमध्ये मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्याची गरज भासते. मात्र, त्यातील केवळ २२.५ टक्के लोकच डायलिसिस करतात, तर मूत्रपिंड निकामी झालेल्या जेमतेम २.५ टक्के रुग्णच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतात. कारण, यासाठी दातेसुद्धा तेवढय़ा प्रमाणात पुढे येत नाही. त्यातच १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात या रुग्णांच्या तुलनेत मूत्रपिंड विकारतज्ज्ञ फारच कमी आहेत. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर औषधोपचाराअभावी मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. आर्थिक टंचाईमुळे वेळेवर डायलिसिस न करणे हे मृत्यूमुखी पडण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचेही फाऊंडेशनने म्हटले आहे.