माशांच्या प्रजननाच्या काळात मासेमारीवर बंदी असल्याने बाजारातील ताज्या मासळीची आवक घटली असून माशाचे दर गगनाला भिडल्याने खवय्यांना मासळी खाण्याचा आनंद लुटण्यासाठी शेकडो रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे ग्राहकांनीदेखील मासळीकडे पाठ फिरवली असून गटारी साजरी करण्यासाठी चिकन, मटण खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. यामुळे चिकन शॉपबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.
 १५ जून ते १५ ऑगस्ट या हे दोन महिने मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने या कालावधीत मासेमारी करण्यास सरकारकडून बंदी घालण्यात येते. यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने तसेच किनाऱ्यावर सोसाटय़ाचा वारा व महाकाय लाटांमुळे मासेमारी करणे धोक्याचे असल्याने मासेमारी बंद आहे. याचाच परिणाम म्हणून मासळीची आवक घटली आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या वाकटय़ा, बोंबील, मांदेली यांचेही दर वाढल्याने व छोटय़ा वाटय़ासाठी किमान १०० रुपये मोजावे लागत असल्याने सामान्यांना मासळी खाणे खर्चीक बनले आहे. खोल समुद्रातील सुरमई, पापलेट, तांब, हलवा अशी मोठी मासळीचे दर हजाराच्या घरात पोहचले आहेत. मासेमारी करणाऱ्या बोटमालकांसाठी हा काळ म्हणजे सुटीचा काळ. मात्र मासळी खरेदी करून त्यांची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची संख्याही अधिक असून खासकरून महिला या व्यवसायात मोठय़ा प्रमाणात आहेत. महागडी मासळी खरेदी करून त्याची विक्री करणे अवघड झाल्याची माहिती मोरा येथील सुषमा कोळी या मासळीविक्रेत्या महिलेने व्यक्त केली आहे. श्रावणाला सोमवारी सुरुवात होणार असल्याने मागील रविवारीच अनेकांना गटारी साजरी केली आहे. शुक्रवारी आलेल्या गटारीसाठी मासळीचे दर वाढल्याने अनेकांनी चिकनचाच बेत आखला असल्याने गटारीसाठी चिकनवरच झुंबड उडणार आहे.