कुलगुरूंचा कणखर निर्णय
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत ‘त्या’ २५० महाविद्यालयांवरील वादग्रस्त प्रवेश बंदी ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. व्यस्थापन परिषदेत व्यवस्थापनाचे प्रतिनिधी जास्त असताना त्यांचा विरोध डावलून कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन कणखर भूमिका वटवली. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाच्या एका प्राधिकरणाने घेतलेला निर्णय दुसऱ्या प्राधिकरणाने नाकारला.
नागपूर विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय भविष्यात सर्वच विद्यापीठांसाठी उपयोगी ठरू शकतो. विद्वत परिषदेने या २५० महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी एक वर्षांची मुदत देण्याचा निर्णय घेतला मात्र, हा निर्णय कशाच्या आधारावर घेतला. याविषयी विरोधकांना योग्य उत्तरे देता आली नाहीत. त्यासाठी २००९मध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षक नेमण्याचा व्यवस्थापन परिषदेचा एक निर्णय विचारात घेण्यात आला. महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरती केली जावी म्हणून विद्यापीठ अनेकदा अधिसूचना काढते, पत्र व स्मरणपत्रेही महाविद्यालयांना पाठवतो. मात्र त्याकडे काणाडोळा करून महाविद्यालयांचे व्यवस्थापन शिक्षक मिळत नसल्याची सबब पुढे  करून वर्षांनुवर्षे शिक्षक भरती करीत नाहीत. त्यामुळे एक वर्ष थांबूनही महाविद्यालयांचे व्यवस्थापन शिक्षक भरती करतील याची अजिबात शाश्वती नसल्याचा युक्तिवाद मोजक्या सदस्यांनी केला.
बहुतेक व्यवस्थापन सदस्य ही प्रवेशबंदी उठवली जावी, याच मताचे होते. मात्र सरतेशेवटी विद्यापीठ कायदा आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला. विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळेही व्यवस्थापन परिषदेवर दबाव आला होता. महाविद्यालयांवरील प्रवेश बंदी उठवताना कशाच्या आधारे ती उठवायची हाही प्रश्न होताच. महाविद्यालयात शिक्षक पाहिजेतच, शिक्षक नसताना महाविद्यालये चालतात कशी, खरोखरच शिक्षक मिळत नाहीत काय, कंत्राटी शिक्षकांचे प्रावधान अशी विविधांगी चर्चा यावेळी झाली.
आजच्या चर्चेला कुलगुरूंनी प्रवेशबंदी न हटवण्याची आणि महाविद्यालयात शिक्षक भरती केलीच पाहिजे, अशी अत्यंत कणखर भूमिका घेतली. त्यांना प्र-कुलगुरू डॉ. महेश येंकी, कुलपती नामित सदस्य डॉ. संजय खडक्कार आणि तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. शिक्षक भरल्याशिवाय प्रवेशबंदी उठवायचीच नाही, या मुद्दय़ावर व्यवस्थापन परिषद सदस्य अडून राहिले. यासंदर्भात डॉ. संजय खडक्कार म्हणाले, विद्यापीठाने घेतलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असून तो सर्वाच्याच हिताचा आहे. सर्वानी मिळून हा निर्णय घेतला. त्यासाठी सांगोपांग चर्चा झाली. इतर विद्यापीठांसाठीही हा निर्णय पथदर्शी ठरणारा आहे. दरम्यान आज विद्यापीठात प्रवेशबंदी कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून व्यवस्थापन सदस्यांना बैठकीसाठी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.