महापालिकेचा निर्णय
पूररेषेतील गावठाण भागात जागा मालकांकडून हमीपत्र घेऊन तसेच सर्व प्रकारच्या अटी-शर्ती शिथील करून बांधकामांना विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राज्य शासनाने अलीकडेच पूररेषेत बांधकामे जलसंपदा विभागाच्या परवानगीने करणे बंधनकारक केले आहे. यामुळे शहरातील पूररेषेतील बांधकामे या विभागाच्या कचाटय़ात सापडण्याची साशंकता व्यक्त होत असताना दुसरीकडे महापालिकेने गावठाण भागातील हजारो मिळकतींच्या रखडलेल्या बांधकाम परवानगीच्या विषयाला हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. प्रदीर्घ काळापासून या बाबत चर्चा सुरू असली तरी सत्ताधारी मनसेने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यास मूर्त स्वरुप दिले. बऱ्याच भवती न् भवतीनंतर प्रत्यक्षात आलेल्या पूररेषेमुळे गोदावरी नदी काठावरील बांधकामे बाधीत झाली. जवळपास साडे तीन हजार मिळकती निळ्या व लाल पूररेषेच्या कचाटय़ात सापडल्या. पूररेषेच्या क्षेत्रात नव्या बांधकामांना परवानगी दिली जात नसल्याने मिळकतधारक त्रस्त झाले होते. पूररेषेंतर्गत नदीकाठावरील जुने नाशिक व पंचवटीतील गावठाण क्षेत्राचा मोठा भाग समाविष्ट होतो. या परिसरात प्रामुख्याने जुने वाडे असून त्यांची अतिशय बिकट झाली आहे. अनेक वाडे मोडकळीस आले आहे. पालिका नव्या बांधकामांना परवानगी देत नाही आणि दुसरीकडे पावसाळ्यात धोकादायक घर म्हणून नोटीस पाठविते अशी तक्रार केली जात होती. या पाश्र्वभूमीवर, सभेत या विषयावर प्रदीर्घ काळ चर्चा करण्यात आली. गावठाण भागातील वाडेधारकांच्या समस्या नगरसेवकांनी मांडल्या.  गावठाण क्षेत्रातील वाडय़ांमध्ये वर्षांनुवर्षांपासून नागरीक वास्तव्य करीत आहे. २००८ व तत्पुर्वी १९६९ मध्ये गोदावरीला आलेला महापूर त्यांनी पाहिला आहे. वाडय़ांची अवस्था धोकादायक झाली असताना नव्या बांधकामांना परवानगी नाकारणे कितपत योग्य ठरेल, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. चर्चेअंती महापौरांनी गावठाण भागातील बांधकामांना विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे जाहीर केले. ही परवानगी देताना जागा मालकाकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. त्यात उपरोक्त ठिकाणी भविष्यात पूरामुळे काही जिवित वा वित्तहानी झाल्यास त्याला पालिका जबाबदार राहणार नाही असे लिहून घेतले जाईल. पूररेषेच्या क्षेत्रात बांधकामांना परवानगी देताना अनेक निकष आहेत. त्याचा अडसर होऊ नये म्हणून सर्व अटी-शर्ती शिथील करून गावठाण भागातील नव्या बांधकामांना ही परवानगी दिली जावी, असे महापौरांनी सूचित केले.

महापालिका-पाटबंधारे विभागात वादाची चिन्हे
पूररेषेतील गावठाण भागात बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णयामुळे महापालिका व पाटबंधारे विभागात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पूररेषेतील बांधकामे जलसंपदा विभागाच्या परवानगीने करण्याचे शासनाने सूचित केले आहे. शहरात नदीकाठावर होणाऱ्या बांधकामांना पाटबंधारे विभागाने वारंवार आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे सिंहस्थात स्वत: हा विभाग नदीपात्रात घाटाचे बांधकाम करीत आहे. या विभागाने नदीकाठालगत बांधकामे करण्यासाठी अनेकांना ना हरकत दाखलेही दिले आहेत. महापालिकेच्या निर्णयामुळे मिळकतधारकांना पुन्हा पाटबंधारे विभागाचे दरवाजे ठोठवावे लागतील की नाही याची स्पष्टता झालेली नाही.