तीन आठवडय़ांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. सर्वच मंडळांची सध्या वेगवेगळ्या परवानग्या घेण्यासाठी प्रशासकीय कार्यालयात धावपळ सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. उत्सवादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घ्यावी, अनधिकृतरीत्या विद्युत कनेक्शन घेऊ नये, ध्वनिक्षेपकाचा त्रास परिसरातील नागरिकांना होणार नाही याची काळजी घ्यावी, शिवाय मंडपाच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जनरेटर, अग्निशमन यंत्रे आदीची उपाययोजना करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे सध्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते महापालिका विभाग कार्यालय, अग्निशामक विभाग आणि नजीकच्या पोलीस ठाण्यात परवानगी घेण्यासाठी धावपळ करीत आहेत.