मराठी बाण्याचे दर्शन कर्नाटक विधिमंडळात घडविणारे आमदार संभाजी पाटील व आमदार अरविंद पाटील यांच्या भाषणात कन्नड आमदारांनी सोमवारी अडथळे आणले. या प्रकाराच्या निषेधार्थ आमदारद्वयींनी सभात्याग केला. तर कन्नड भाषेचा अवमान केल्याचा राग व्यक्त करीत कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी संभाजी पाटील यांच्या कॅम्प भागातील जनसंपर्क कार्यालयाची मोडतोड केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषक युवा आघाडी सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बेळगाव येथे मराठी भाषकांचा महामेळावा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, मुंबईचे महापौर सुनील प्रभु, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, आमदार के.पी.पाटील यांच्यासह हजारो मराठी भाषकांच्या उपस्थितीत पार पडला.     
कर्नाटक शासनाने मराठी भाषकांवरील अन्यायाची परंपरा कायम ठेवीत सलग दुसऱ्या वर्षी बेळगाव येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले. सोमवारी अधिवेशनाचा पहिला दिवस मराठी भाषक आमदाराच्या मराठमोळ्या बाण्यामुळे गाजला. सभेचे कामकाज सुरू झाल्यावर आमदार संभाजी पाटील यांनी घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली कर्नाटक शासन करीत असल्याचा आरोप केला. ज्या भाषेचे पंधरा टक्के लोक राहतात तेथे त्यांच्या भाषेत शासनाने परिपत्रक निघाले पाहिजे, असे घटनेत नमूद केले आहे, असा उल्लेख करून आमदार पाटील यांनी आपण बेळगावचे चार वेळा महापौरपद भूषविले तेव्हा मराठी व कन्नड दोन्ही भाषेत परिपत्रक काढून घटनेचा आदर केला होता. पण आता कन्नडधार्जिणे धोरण स्वीकारणारे शासन मराठी भाषकांवर अन्याय करीत आहे, असे त्यांनी सांगितले.     
त्यांच्या या विधानाला आक्षेप घेत कन्नड आमदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर आमदार संभाजी पाटील व आमदार अरविंद पाटील यांनी राष्ट्रभाषा हिंदीतून आपल्या विधानाचा सारांश मांडण्यात सुरुवात केल्यावर त्याची दखल सभापती कागवाड तिमाप्पा यांनी करत त्यांना बोलण्यास परवानगी दिली. तरीही कन्नड भाषक आमदात ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी कन्नड भाषेत बोलण्याचा आग्रह कायम ठेवत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रभाषेतही बोलण्यास दिले जात नसल्याचा निषेध नोंदवित आमदार पाटीलद्वयींनी सभापतींसमोरूनच ‘बेळगाव, कारवार, बिलगीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत सभात्याग केला.    
सभात्याग केलेल्या दोघा आमदारांनी टिळकवाडी येथे आयोजित केलेल्या मराठी भाषक महामेळाव्याकडे प्रयाण केले. ही संधी साधत कन्नड गुंडांनी आमदार संभाजी पाटील यांच्या कँॅम्पभागातील कार्यालयाची मोडतोड केली. पंधरा ते वीस संख्येने आलेल्या कन्नड गुंडांनी बळजोरी चालविल्यावर तेथे उपस्थितीत असलेले मराठी भाषक युवा आघाडीचे उपाध्यक्ष भाऊ शहापूरकर यांच्यासह दोन-तीन कार्यकर्त्यांनी कन्नड गुंडांना मराठी मनगटाची ताकद दाखवित सळो की पळो करून सोडले. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संभाजी पाटील म्हणाले, कन्नड भाषक गुंडांच्या भ्याड हल्ल्याला उत्तर देण्यासाठी शिवरायांचे वारसदार सज्ज होत आहेत. बेंगलोर येथे जाऊन नारायण गौडा यांना मराठी भाषक युवा आघाडी थेट आव्हान देणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.