मुंबईतील रेल्वेमार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चर्चा चालू असताना पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या महामार्गावर गोरेगाव येथील आरे उड्डाणपुलाजवळ असलेल्या या पेट्रोल पंपावर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने या ठिकाणी दर दिवशी अपघात होत असल्याचे खुद्द पेट्रोल पंपावरचे कर्मचारीच सांगतात. मात्र वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारल्यास, हे अपघात पेट्रोल पंपावर जाण्यासाठीच्या वाहनांचे होत नसून जलद मार्गाने गाडय़ा चालवल्यामुळे होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीहून मुंबईकडे येताना बोरिवलीतील पेट्रोल पंपानंतर एकही पेट्रोल पंप नव्हता. मात्र या वर्षी ४ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथील आरे उड्डाणपूल उतरल्यावर लगेचच एक पेट्रोल पंप उघडण्यात आला. मात्र या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानंतर जवळपास दर दिवशी या ठिकाणी अपघात होऊ लागले आहेत. या पेट्रोल पंपावर येण्यासाठी उड्डाणपूल उतरल्यानंतर तीव्र वळण घ्यावे लागते. रस्त्यावरील दोन दुभाजक ओलांडून या पेट्रोल पंपावर येणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. मात्र याबाबत वनराई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अपघातांच्या संख्येत झालेली वाढ आणि पेट्रोल पंपाचे स्थान यांचा काहीच परस्परसंबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलावरून उतरताना गाडय़ा खूपच वेगात असतात. त्यामुळे हे अपघात होत आहेत. त्यात तीव्र वळणाचा काहीच भाग नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.