मुंबई विद्यापीठाचा बहि:शाल शिक्षण विभाग आणि संजीवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहरात प्रथमच पाळीव प्राणी दिवस साजरा करण्यात येत आहे. १६ नोव्हेंबरला विद्यापीठाच्या सांताक्रूझ येथील संकुलातील आरोग्य केंद्र इमारतीच्या परिसरात सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने प्रसिद्ध पशुवैद्यक उमेश करकरे आणि त्यांचा चमू पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करतील आणि सोबत आणलेल्या पाळीव प्राणी-पक्षी-मासे यांची आरोग्य तपासणी नि:शुल्क करून देण्यात येईल. फक्त कायदेशीरदृष्टय़ा योग्य म्हणजे परदेशी प्राणी, पक्षी आणि कुत्रे-मांजरी या पाळीव प्राण्यांची आरोग्य चिकित्सा केली जाईल. संजीवनचे सदस्य पाळीव प्राण्यांच्या बाबतीतील कायद्यांबद्दलही मार्गदर्शन करतील. पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू आणि खाद्याबद्दलची माहिती आणि नमुनेही येथे उपलब्ध असतील. प्राणी-पक्षी पाळणारे या निमित्ताने एकमेकांना भेटून अनुभवांची देवाणघेवाण करू शकतील. पाळीव प्राणी असलेल्यांनी तसेच ज्यांना पाळीव प्राणी बाळगण्याची मनीषा आहे, त्यांना यात सहभागी होता येईल. लहान मुलांनाही या कार्यशाळेला प्रवेश दिला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा असणार आहेत. नोंदणीसाठी संपर्क – सुबोध गोरे – ९८२०४१३४८९, २६५४३०११, २६५३०२६६.