निर्सग छायाचित्रांचे, ग्रामीण कलाकुसरीचे, वेगवेगळ्या पेंटिंगचे प्रदर्शन होणाऱ्या मोठय़ा शहरांमध्ये आता पोलीसही मागे राहिले नसून, त्यांनी ६ सप्टेंबर रोजी फोटो गॅलरीचे आयोजन केले आहे, पण यात डोळांना सुखवतील असे फोटो असतील याची खात्री नाही. त्यात हरवलेल्या, ओळख न पटलेल्या अस्ताव्यस्त मृतांचे तसेच खुनासारख्या गुन्ह्य़ात उघडीस न आलेल्या आरोपींचे फोटो असणार आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने शुक्रवारी एक फोटो गॅलरी प्रदर्शन सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयात भरविण्यात येणार आहे.
पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या आदेशाने सध्या राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयात अशा प्रकारचे फोटो गॅलरी प्रदर्शन भरविण्याची तयारी सुरू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुष्यमान हे तसे इतर आयुक्तालयाच्या तुलनेने जास्त नाही. तरीही जानेवारी २००८ ते जुलै २०१३ या सहा वर्षांत पोलीस आयुक्तालय परिसरातून हरवलेल्या व्यक्ती, बेवारस मृतदेहाचे छायाचित्र आणि अनेक गुन्ह्य़ांत उघडीस न आलेल्या आरोपीचे फोटो यांचे एक प्रदर्शन सीबीडी सेक्टर १० येथील आयुक्तालयात शुक्रवारी भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात ५०० पेक्षा जास्त छायाचित्रे त्यांच्या माहितीसह ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी सांगितले. त्यासाठी ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर या आजूबाजूच्या जिल्ह्य़ांतील आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयांना संदेश पाठविण्यात आले आहेत. राज्यातील सर्व आयुक्तालयातील तपास अधिकारी किंवा नातेवाईकांना या ठिकाणी यावे आणि आपल्या व्यक्तींची ओळख पटवावी असा या मागचा उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले. ठाण्यामध्ये अशा प्रकारची फोटो गॅलरी भरविण्यात आली होती. त्यामुळे तीन गंभीर गुन्ह्य़ांचा तपास लागू शकला, असेही पाटील यांनी सांगितले. जास्तीत जास्त तपास अधिकारी किंवा हरवलेल्या व्यक्तींचे नातेवाईक याठिकाणी आल्यास तपास प्रक्रियेतील पोलिसांचा बराचसा भार हलका होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना वेळप्रसंगी जे फोटो बघण्यायोग्यदेखील नाहीत अशा फोटोंचे प्रदर्शन भरवण्याची वेळ येते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.