विटावा पेट्रोल पंपनजीक गणपती पाडा येथील एमआयडीसीच्या भूखंडावर उभ्या ठाकलेल्या अंबिका इमारतीवर कारवाई करण्यासाठी एमआयडीसीने न्यायालयात धाव घेतली आहे. या अनधिकृत इमारतीला नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे या इमारतीला पालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडीत करून बिनधास्तपणे पाण्याची जोडणी करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीने या ठिकाणी अनधिकृतपणे घरे वसल्यास त्यावर होणाऱ्या कारवाईला आपण जबाबदार नसल्याचे फलक उभारले आहेत. तर महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून या इमारतीच्या बिल्डरने परस्पर नळजोडणी केली आहे.  
एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृतपणे इमारती उभ्या राहिल्यानंतर एमआयडीसीने धडक कारवाई केली होती. शहरातील अनेक इमारतीबरोबरच गणपतीपाडय़ातील अंबिका इमारतीवर हातोडा टाकला होता. त्यानंतरही येथील बिल्डरने एमआयडीसीला नजरआड करीत इमारत उभी केली. ही अनधिकृत इमारत उभी ठाकलेली असताना या इमारतीला आता पाण्याची नळजोडणी पालिका अधिकाऱ्यांनी बिनबोभाटपणे करून दिल्याचा प्रताप समोर आला आहे. एमआयडीसीने सदरची जागा खासगी कंपन्यांसाठी विक्रीस काढल्याने या ठिकाणच्या अंबिका इमारतीवर कायदेशीरपणे कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.
बिल्डराच्या विरोधात एमआयडीसी न्यायालयातदेखील जाणार आहे. त्यामुळे बिल्डरांच्या स्वार्थापोटी या सात मजली इमारतीतील शेकडो नागरिकांचे घरे घेण्याचे स्वप्न कारवाई झाल्यानंतर जमीनदोस्त होणार आहे. दरम्यान पाणी खात्यात खिरापत लाटणाऱ्या वरिष्ठ ते दुय्यम अधिकाऱ्यांनी या इमारतीला नळजोडणी करून दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चोरून पाणी वापरून कर बुडवणाऱ्यांवर कारवाई न करणारे पालिकेचे अधिकारी पालिका आयुक्तांच्या मोहिमेला कसे काळे फासतात आणि शहरात अनधिकृत बांधकामांना कसे अभय देतात. हा प्रश्न समोर आला आहे. या इमारतीला देण्यात आलेल्या नळजोडण्यांवर कारवाई देखील केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही पुन्हा नळजोडणी कशी झाली असे हे मात्र गुलदस्त्यात आहे. तर चार महिन्यांपासून चोरून पाणीपुरवठा सुरू असल्याने अंबिकाच्या खिरापतीत पालिका अधिकाऱ्यांचे मीटर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लक्ष घालून अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांचा समाचार कधी घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  
अंबिका इमारतीवर येत्या काही दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्यात येईल. अनधिकृतपणे एमआयडीसीच्या जागेवर उभ्या असणाऱ्या इमारतीमध्ये नागरिकांनी घरे घेऊन आपले नुकसान करू नये असे आवाहनदेखील आम्ही यापूर्वी केले आहे.  
    -अविनाश माळी, उपअभियंता एमआयडीसी