ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील प्रमुख चौकांमध्ये वाहनचालकांकडे भीक मागणारे ठाणे पोलिसांच्या रडारावर आले आहेत. ठाणे पोलिसांनी नव्याने स्थापन केलेल्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत शहरातील चौकांमध्ये भीक मागणाऱ्या लहान मुलांची सुटका करण्यात येत आहे. याशिवाय या मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पालक आणि टोळ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत ठाणे शहरात भीक मागणाऱ्या २२ लहान मुलांची सुटका करण्यात आली असून पुनर्वसनाकरिता त्यांना भिवंडीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे ठाणे शहरातील चौकाचौकांमध्ये भीक मागणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण घटल्याचे चित्र पाहावयास मिळते.
 शहरातील अतिशय वर्दळीची ठिकाणे असलेल्या ठाणे स्थानक, तलावपाळी तसेच अन्य गर्दीच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून भिकाऱ्यांचा वावर वाढला होता. याशिवाय तीनहात नाका, कॅडबरी, कापुरबावडी जंक्शन तसेच अन्य सिग्नलच्या परिसरातही भिकारी आढळून येत होते. विशेष म्हणजे, भीक मागणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत होते. भीक मागणाऱ्या या लहान मुलांमुळे वाहन चालकही हैराण झाले होते. सिग्नल किंवा चौकात वाहन उभे राहिले की भिकारी वाहनाची काच ठोकणारच, असा प्रत्यय वाहन चालकांना येऊ लागला होता. दरम्यान, लहान मुले हरविण्याचे आणि घरातून पळून जाण्याचे प्रकार वाढू लागले आहे. काही मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला प्रवृत्त करण्यात येत असून त्यामध्ये काही टोळ्या कार्यरत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्यामुळे अनेकदा लहान मुलांचा शोध लागत नाही. याच पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात आणि प्रमुख चौकांमध्ये भीक मागणारी मुले नेमकी कुठून आली आणि त्यांचे पालक कोण, याचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी मोहीम हाती घेतली. जुलै महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत २२ मुलांची सुटका करण्यात आली असून ही सर्व मुले सात ते १४ वयोगटांतील आहेत. ठाणे स्थानक, तलावपाळी, टेंभीनाका, कापुरबावडी जंक्शन, आदी परिसरातून या मुलांची सुटका करण्यात आली असून त्यांच्या पालकांचाही शोध घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व मुले कळवा परिसरातील झोपडपट्टी भागात राहणारी असून त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे अनेक मुलांच्या पालकांनीच त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय काही पालक गर्दीच्या परिसरात मोलमजुरीचे कामे करीत असून त्यांच्यासोबत त्यांचे पाल्यही येत असतात. पालक कामात व्यस्त असल्याने त्यांचे पाल्यावर लक्ष नसते. त्यामुळे अन्य भिकाऱ्यांना पाहून पैशांकरिता पाल्यही भीक मागतात. मात्र, त्याविषयी पालकांना काहीच माहीत नसते, अशी माहिती मदन बल्लाळ यांनी दिली. गेल्या चार महिन्यांत ठाणे शहरात भीक मागणाऱ्या २२ लहान मुलांची सुटका करण्यात आली असून त्यांना भिवंडीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्या पुनर्वसनाकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मुलांना शाळेत पाठवा, असे समुपदेशन तज्ज्ञांमार्फत पालकांना करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमुळे लहान मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या पालक आणि टोळ्यांनी धसका घेतला असून त्या शहरातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. याशिवाय पोलिसांमार्फत शहरात भीक मागणाऱ्या लहान मुलांची सुटका करून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी भिकाऱ्यांचा वावर कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.