दिवाळी अंकासाठी मतदारांच्या प्रतिनिधींना ‘जाहिराती’ द्यायच्या आहेत, असे सांगत शहरात बहुतांश पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी अनेक व्यापाऱ्यांकडून लाखोची माया उकळत ‘दिवाळी’ साजरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाचा विशेष सहभाग असल्याचे सांगण्यात आले. प्रभारी पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी या ‘लूटमारी’च्या वृत्ताला दुजोरा देत अधिक माहिती घेऊ, असे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे चित्र आहे. अधीक्षक विठ्ठलराव जाधव सुटीवर असल्याने जिल्ह्याच्या कारभाराची धुरा अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले यांच्याकडे आहे. दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना जाहिराती द्यायच्या आहेत. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवाळीची ‘भेट’ द्यायची आहे, असे सांगत शहरातल्या सहापकी बहुतेक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत वैध किंवा अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात रकमा वसूल केल्या. धमकीवजा इशारे देत जमा केलेल्या रकमांपकी काही रक्कम खर्च करण्यात आली; पण जमा व खर्चाची रक्कम यात मोठी तफावत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
वजिराबाद, इतवारा, सिडको, शिवाजीनगर, विमानतळ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी रक्कम गोळा करून खर्च करताना हात वर केले. या शिवाय सध्या शहरात कार्यरत व ‘प्रसिद्धीच्या झोतात’ असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अक्षरश जबरदस्ती केल्याचे सांगण्यात आले. या पथकाने आतापर्यंत मंगळसूत्र चोरी, बॅग पळविणे, दरोडा यांसारख्या एकाही गंभीर गुन्ह्याचा शोध लावला नाही. पथकात वर्षांनुवष्रे तेच ते कर्मचारी असल्याने पोलीस ठाण्यांतील अधिकारीही दबकून असतात. पथकातील कर्मचाऱ्यांनी माध्यमांच्या, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘भेट’ देण्याच्या नावाखाली उकळलेल्या रकमेची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांच्या पथकाने केलेल्या या प्रतापाची त्यांना तरी माहिती आहे की नाही, हे मात्र समजू शकले नाही.
वजिराबादप्रमाणेच इतवारा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे मनमानी केल्याची माहिती समोर आली आहे. आपले वरिष्ठ अधिकारी काहीच करु शकत नाहीत, अशा अविर्भावात पोलीस अधिकारी असल्याने अनागोंदी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. इतवारा उपविभागाचे सहायक अधीक्षक पंकज देशमुख सुटीवर असल्याची संधी साधत इतवारा ठाण्याचे निरीक्षक कोडे यांच्या अधिपत्याखालील पथकाने सर्वच व्यापाऱ्यांना वेठीस धरले होते, असे सांगण्यात आले.
दरम्यान, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील काही अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या नावाखाली जमा केलेल्या रकमांबाबत कुणकुण आपल्याला लागली आहे. अनागोंदीचा प्रयत्न केल्याची माहिती माझ्याकडे आहे. या बाबत माहिती घेत असल्याचे प्रभारी अधीक्षक चिखले यांनी सांगितले.