नागरिकांनी सोनसाखळी चोरांपासून सावध राहावे तसेच भामटय़ांच्या बतावणीला बळी पडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष जनजागृती अभियान हाती घेतले असून त्यामध्ये पथनाटय़ाच्या माध्यमातून सोनसाखळी चोर आणि भामटय़ांच्या कार्यपद्धती नागरिकांपुढे मांडण्यात येत आहेत. या अभियानामुळे नागरिक सावध होऊन सोनसाखळी चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्य़ांना काहीसा आळा बसेल, असा ठाणे पोलिसांचा दावा आहे. एकंदरीतच सोनसाखळी चोर आणि भामटय़ांचा उपद्रव रोखण्यासाठी ठाणे पोलीस त्याच्या ‘कार्यपद्धतीचा’ कानमंत्र देऊन नागरिकांना ‘चोरावर मोर बना’ असाच सल्ला देत असल्याचे चित्र आहे.
ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरी तसेच फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सोनसाखळी चोरी तसेच फसवणुकीच्या गुन्ह्य़ातून झटपट पैसे मिळत असल्याने अनेक वेगवेगळ्या टोळ्या या गुन्ह्य़ांमध्ये सक्रिय झाल्याचे चित्र आहेत. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दर वाढल्यामुळे सोनसाखळी चोरीचा मार्ग अनेक टोळ्यांनी अवलंबला आहे. मात्र, या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून पोलिसांच्या कामगिरीविषयी फारसे समाधानी नाहीत. ठाणे पोलिसांनी यापूर्वी सोनसाखळी चोरीच्या अनेक टोळ्या पकडून त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात जबरी चोरी, मोक्कांतर्गत कारवाईही केली आहे. असे असले तरी सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव थांबत नसल्याचे चित्र आहे.
 या पाश्र्वभूमीवर आता ठाणे पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून रविवारपासून शहरातील वेगवेगळ्या भागांत या अभियानाला सुरुवात केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतील तलाव परिसरात नागरिक मोठय़ा प्रमाणात मॉर्निग वॉकसाठी येतात आणि त्याच ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.
त्यामुळे शहरातील मासुंदा, आंबेघोसाळे, कचराळी, उपवन या तलाव परिसरांत पोलिसांनी रविवारी सकाळी अभियान राबविले. मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तसेच अभियानांतर्गत पोलिसांनी सुमारे २० ते २५ मिनिटांचे पथनाटय़ सादर केले. त्यामध्ये सोनसाखळी चोर आणि भामटय़ांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना त्यांच्या कार्यपद्धती सांगण्यात आल्या.