गेल्या दोन दिवसात अमरावती जिल्ह्य़ात ठिकठिकाणाहून पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान २५ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याने व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत. निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने पोलीस यंत्रणा जिल्ह्य़ात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मंगळवारी तळेगाव दशासर पोलिसांनी धामणगावकडे येणाऱ्या मारुती ऑल्टो कारमधून १५ लाख ८४ हजार रुपयांची रक्कम जप्त केली. धान्य व्यावसायिकाची ही रक्कम जप्त करण्यात आल्याने निवडणूक काळात व्यवहार कसे करायचे, असा पेच निर्माण झाला आहे. गेल्या आठवडय़ात अमरावतीत नाकेबंदीदरम्यान एका कारमधून ७५ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. छत्तीसगडमधील इंडिया अॅग्रो अॅन्ड फूड कंपनीने पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना देण्यासाठी ही रक्कम पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, पण निवडणूक काळात ही मोठी रक्कम आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. सुरक्षेच्या दृष्टीने ही रक्कम आता जिल्हा कोषागारात ठेवण्यात आली असून कंपनीने जप्त रोकड आणि कार परत मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला आहे. आपले म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अवधी मागितला आहे. इंडिया अॅग्रो कंपनीची ही रक्कम तूर्तास अडकून पडली आहे.
वाहनांच्या तपासणीदरम्यान बडनेराजवळील अकोला टी-पॉइंट येथून एका स्कॉर्पिओ गाडीतून पोलिसांनी ५ लाख ६ हजार रुपये मंगळवारी जप्त केले. पोलिसांनी वाहन देखील ताब्यात घेतले आहे. हिंगोली जिल्ह्य़ातील विनोद डोंगरे आणि स्वपी्नल तिवारी या दोघांकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. वॉलमार्टमधून वस्तूंच्या खरेदीसाठी ही रक्कम सोबत आणल्याचे या दोघांनी सांगितले, पण पोलिसांनी चटकन त्यांच्यावर विश्वास न ठेवता, त्यांची चौकशी सुरू केली आहे. तळेगाव दशासर पोलिसांनी माहुली येथील धान्य व्यापारी रूपेश वानखडे यांच्या मारुती ऑल्टो कारमधून १६ लाख रुपये जप्त केले. ही रक्कम धामणगावमधून सोमवारी खरेदी केलेल्या हरभरा आणि कापसाच्या चुकाऱ्यासाठी नेली जात होती, असे वानखडे यांनी सांगितले. धामणगावच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून ही रक्कम काढल्याचे वानखडे यांनी पोलिसांना सांगितले, पण या ठिकाणीही पोलिसांनी अडवणूक केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावती जिल्ह्य़ात मध्यप्रदेशच्या सीमेवर भोकरबर्डी तपासणी नाक्यावर सोमवारी धारणी पोलिसांनी ५ लाख रुपये एका वाहनातून जप्त केले. धारणी येथील धान्य व्यापारी मो. सलीम मेमन यांचा धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातून ५ लाख रुपये काढले. मध्यप्रदेशातील खंडवा येथे धान्य खरेदीसाठी ही रक्कम सोबत घेऊन ते गेले होते, पण धान्याचा दर्जा चांगला नसल्याने ते तसेच परतले, पण भोकरबर्डी येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर त्यांना पोलिसांनी अडवले. एकीकडे, निवडणूक काळात पैशांचा महापूर वाहण्याची शक्यता असताना पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली आहे, पण त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसू लागला आहे. व्यावसायिक कामासाठी देखील रोकड वाहून नेणे आता जोखमीचे झाले आहे.