भारतात क्षयरोगाने दरवर्षी लाखो रुग्ण मृत्युमुखी पडतात. त्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा भक्कम असली तरी त्यात स्वयंसेवी संस्था व राजकीय इच्छाशक्ती असेल तर क्षयरोगावर आपण नियंत्रण मिळवू शकतो, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी व्यक्त केले.
हॉटेल सूर्या येथे ग्लोबल हेल्थ अॅडव्होकेट्स आणि हॅलो फाउंडेशनच्यावतीने ‘बाल व मातामृत्यू आणि क्षयरोग’ या विषयावर सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उद्घाटक म्हणून डॉ. माळी बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. लाळे, डॉ. देशमुख (उस्मानाबाद), हॅलो फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी, समन्वयक उपेंद्र टण्णू , बातूल बालासिनोरवाला, डॉ. श्रीकांत येळेगावकर आदी उपस्थित होते.
डॉ. माळी म्हणाल्या,की क्षयरोगाला आपण आळा घालू शकतो.सामूहिक प्रयत्नांनीच हे शक्य आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने होणारे क्षयरुग्णांचे मृत्यू चिंताजनक असून माता व बालमृत्यू रोखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. लाळे व उस्मानाबादचे डॉ. देशमुख यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा सादर केला. ग्लोबल हेल्थ अॅडव्होकेट्सच्या कार्यक्रम अधिकारी बातूल बालासिनोरवाला यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सांगितला. या कार्यशाळेत सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचे रवींद्र चिंचोळकर, समाजसेविका अरूणा बुरटे, रवींद्र मोकाशी आदींचा प्रमुख सहभाग होता. कार्यशाळेचा समारोप उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. वनिता कोळी यांनी आभार मानले.