News Flash

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच समाजात बदल घडेल

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच सामाजिक जीवनात बदल घडू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

| July 8, 2013 01:55 am

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच सामाजिक जीवनात बदल घडू शकेल. समाजात पन्नास टक्के लोकसंख्येने असलेल्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वासाची भावना वाढली नाही तर समाज पुढे जाऊ शकणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
सोलापुरातील काँग्रेसच्या नेत्या, माजी आमदार निर्मला ठोकळ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी निर्मला ठोकळ यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित तयार केलेल्या ‘स्वयंसिध्दा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, शेकापचे नेते गणपतराव देशमुख, खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सुधाकर परिचारक, महापौर अलका राठोड आदी उपस्थित होते. निर्मला ठोकळ अमृतमहोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष, आमदार दिलीप माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
निर्मला ठोकळ यांच्या सार्वजनिक सेवेचा मुक्तकंठाने गौरव केला. दिवंगत स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांच्यापासून जनसेवेचे बाळकडू त्यांच्या कन्या निर्मला ठोकळ यांना मिळाले. त्यांनी राजकीय, सहकार क्षेत्रात कर्तृत्व दाखविले. विधिमंडळात अभ्यासूपणे काम करणाऱ्या त्या काळात ज्या थोडय़ा महिला होत्या, त्यात निर्मला ठोकळ यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, अशा शब्दात पवार यांना त्यांचा गुणगौरव केला. १९६७ साली विधानसभा निवडणुकीत आपण उभे होतो, त्या वेळी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात तुळशीदास जाधव हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्याकाळी लोकसभा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदारसंघातील आमदारांवर जबाबदारी टाकली जात असे. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तुळशीदास जाधव यांनी आपणास आमदार म्हणून प्रचाराचे काम करण्यासाठी सहा हजारांची रक्कम दिली होती, अशी आठवण काढत पवार यांनी, त्या काळच्या निवडणुका आणि आजकालच्या निवडणुका व त्यातील खर्च यात जमीन आस्मानाच फरक वाटतो, असा शेरा मारला.
सुशीलकुमार शिंदे यांनी निर्मला ठोकळ यांना त्यांचे पिताजी तुळशीदास जाधव यांच्याकडून राजकीय वारसा मिळाल्यानंतर त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिल्याचे सांगितले. नगरसेवक, आमदार ते मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले यांच्या मेव्हुणी असा प्रवास करताना त्यांनी सत्तेचा रूबाब कधीही दाखविला नाही. त्यांनी सामान्यजनांना नेहमीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे उद्गार शिंदे यांनी काढले.
या वेळी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, धर्मसिंग, प्रा. आनंद जाधव आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव ठोकळ यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 1:55 am

Web Title: politics with social services removes the community sharad pawar
Next Stories
1 सोलापूर पालिकेचा कारभार रुळावर येण्यासाठी गुडेवार यांना पाचारण
2 सेवेत कार्यरत जवान संशयास्पद रीत्या बेपत्ता; कुटुंबाची परवड
3 आता हवामानावर आधारीत पीक विमा -कृषिमंत्री विखे
Just Now!
X