कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण आटोक्यात आणण्याबाबत दहा दिवसांमध्ये उपाययोजना अमलात आणण्याचा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. १२ जुलै रोजी कोणत्या उपाययोजना अमलात आणल्या याचे अवलोकन करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व आंदोलकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचेही या वेळी ठरले.     
कागल पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आंदोलकांचे नेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मेट्रो टेक्स्टाइल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील, सीईटीपीचे अध्यक्ष भरत पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता के. एस. भांडेकर, उपअभियंता बी. एस. भांदिगरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, व्ही. आर. भोसले आदी उपस्थित होते.     
चर्चेवेळी डॉ. मिणचेकर, मुरलीधर जाधव, शिवसेनेचे हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, शाहूवाडी विधानसभा संपर्कप्रमुख दत्तात्रय निकम यांच्यासह इंगळी, तळदंगे, हुपरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाची तीव्रता स्पष्ट करून याबाबतची उपाययोजना करावी, अशी मागणी केली. आंदोलकांनी मांडलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय याप्रमाणे- सीईटीपीमधील टाक्यांमध्ये साचलेला गाळ दहा दिवसांमध्ये काढून घेण्याचे काम सीईटीपी असोसिएशनकडून केले जाईल. त्यामध्ये येणाऱ्या व निर्गत होणाऱ्या पाण्याचे पृथक्करण दररोज केले जाईल. सिद्धिविनायक एन्टरप्रायजेसमधून तळंदगे गावामध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने गावकऱ्यांनी यास आक्षेप घेतला. याबाबत या कंपनीचे गत सहा महिन्यांचे विद्युत देयक तपासून त्याआधारे कंपनी पूर्णक्षमतेने सुरू करावी की कसे याची खातरजमा केली जाईल. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांडपाणी गावाच्या हद्दीत न सोडण्याबाबत आदेश दिले जातील.    
सध्या चालू असणाऱ्या औद्योगिक घटकांना सीईटीपीमध्ये पाणी सोडण्याचे वेळापत्रक निश्चित केले जाईल. संबंधित उद्योगांनी त्यांच्याकडून सोडण्यात येणाऱ्या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसविण्याची कार्यवाही सुरू करावी, इंडोकाऊंट व ओसवाल या कंपन्यांनी परिसरामध्ये साठवलेला गाळ योग्यरीत्या साठवण करावा. अस्तित्वातील एचआरटीएसचे विस्तारीकरण करण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.