ठाणे येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा परिसरातील सव्‍‌र्हिस रस्त्यांवर खड्डे पडल्याने आसपासच्या परिसरातील रहिवासी हैराण झाले असून त्यांनी यासंबंधी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. पण, त्याची दखल घेत नसल्याने संतप्त रहिवाशांनी बुधवारी महापालिकेच्या माजिवडा प्रभाग समितीवर मोर्चा काढला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत या मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले.माजिवडा परिसरात लोढा पॅरेडाइज, रुस्तमजी आणि वैभव विलास, अशा सुमारे १६ गृहसंकुले असून त्यामध्ये सुमारे २० हजारांहून अधिक नागरिक राहतात. या गृहसंकुलांपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावर जाण्यासाठी एकमेव सव्‍‌र्हिस रोड असून तेथून या गृहसंकुलातील रहिवाशांच्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. यंदाच्या पावसाळ्यात या सव्‍‌र्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने रहिवाशांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात, रहिवाशांनी महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते. यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच नव्या पर्यायी रस्त्याची मागणी केली होती. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याने रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. याच पाश्र्वभूमीवर रहिवाशांनी सोमवारी महापालिकेच्या माजीवडा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा नेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली. दरम्यान, साहाय्यक आयुक्त आणि प्रभाग अधिकारी यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी आंदोलनकर्त्यांचे बोलणे करून दिले. त्या वेळी शिंदे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनाकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती लोढा पॅरेडाइज हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी अशोक पोहेकर यांनी दिली.