टोलवसुलीवरुन राज्यात चर्चेत आलेल्या शीव-पनवेल मार्गावर पावसाळ्यात विविध ३६ ठिकाणी पडलेले खड्डे सायन-पनवेल टोलवेज कंपनीने दुरुस्त केले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. या खड्डय़ांमुळे सुसाट वेगाने होणाऱ्या वाहतुकीला नेमकी याच ठिकाणी खीळ बसत असून छोटे-मोठे अपघातदेखील होत होते. त्यामुळे टोल वसुलीसाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या कंपनीच्या नावाने वाहनचालक शिमगा करीत होते. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हे खड्डे दुरुस्त करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मुंबईमधून निघणाऱ्या वाहतुकीला शीव-पनवेल मार्गावर खोळंबा होत होता. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ तत्त्वावर १२०० कोटी रुपये खर्च करून मानखुर्द ते पनवेल असा २३ किलोमीटर लांबीचा चकाचक रस्ता बांधला. या रस्ते उभारणीत सिमेंट क्राँक्रीटीकरणाचा जास्त वापर करण्यात आल्याने सरकार दरबारी हा खर्च १२०० कोटी रुपये दाखविला जात असला तरी तो १८०० कोटी रुपयांच्या घरात गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा खर्च वसुलीसाठी शासनाने या रस्त्यासाठी खारघर येथे टोलवसुली करण्याची परवानगी रस्ते बांधणाऱ्या कंपनीला दिली आहे. या टोलवसुलीवरून बराच गदारोळ झाला, पण तो बंद करण्यात आला नाही. सरकारने राज्यातील ५३ टोलनाक्यावर वसुली बंद केल्यानंतर या टोलनाक्यावरही हलक्या वाहनांसाठी वसुली बंद करण्यात आली आहे, पण त्याविरोधात कंपनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून अशी वसुली बंद झाल्यास बँकेचे हप्ते भरणे अवघड होईल, असा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे या मार्गावर पावसाळ्यात पडणाऱ्या खडय़ाकडे कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे वाशी, सानपाडा, तुर्भे, शिरवणे, उरण फाटा, कोपरा, कळंबोली या उड्डाणपुलावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले  होते. तुर्भे येथील सावन नॉलेज सिटीसमोर तर वाहतुकीची चांगलीच कोंडी होत असल्याने पुढे वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र होते. कंपनीने चार दिवस मिळालेल्या पावसाच्या उघडिपीनंतर ३६ ठिकाणी खड्डय़ांची डागडुजी व दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर पूर्वीसारखी वाहतूक सुरळीत होण्यास वाव मिळणार आहे.