शेतमालाला योग्य भाव नसल्याच्या निषेधार्थ ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रक्ताने भिजलेल्या कापसाची बोडे थेट मुख्यमंत्र्यांना पाठविली आहे.
आर्वीच्या प्रहार शाखेचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्वीत हा अभिनव निषेध नोंदविला. शेतमालाला भाव नाही. त्याचे सरकारला काहीच सोयरसुतक नाही. २० डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर प्रहारचा मोर्चा आहे. तेथेही सरकारचा हल्ला राहीलच. शेतकऱ्यांना योग्य भाव न देता त्यांचे रक्त पिणारे व त्यासाठी भांडणाऱ्यांवर लाठय़ा काढून रक्त काढणाऱ्या सरकारला आता रक्ताची चटकच लागली आहे म्हणून रक्त सांडविण्यापूर्वीच आम्ही आमचे रक्त कापसात भिजवून देत आहे, असे बाळा जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून स्पष्ट केले.
२००५ मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेल्या डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत ५० टक्के नफो विचारात घेऊन ठरविण्याचे सांगितले. शिफोरस मान्य झाली, पण अंमलात आली नाही. राज्याचे प्रस्तावित केलेली किंमत केंद्र द्यायला तयार नाही. राज्य शासनाने केलेली शिफोरस व केंद्रशासनाने जाहीर केलेला हमीभाव याच्यात बाजारभावाने निघणारी तफोवत ही रक्कम बोनस म्हणून द्यावी, अशी मागणी प्रहारने पंतप्रधान व मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कापूस, सोयाबिन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला आंदोलनाची नवी चुणूक दाखविण्याचा ईशाराही देण्यात आला आहे. प्रहारने रक्ताने माखलेल्या कापसासह आपल्या मागण्यांचे निवेदन आर्वीचे उपविभागीय अधिकारी सुनील कोरडे यांना दिले. यावेळी प्रहारचे सुधीर जाचक, धीरज सारसर, अतुल कडू, निलेश ठाकरे, गजानन होरे व कार्यकर्ते उपस्थित होते.