मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी प्रवाशांना उतरवून त्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या खाजगी बस वाहतुकीला लगाम घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या बस गाडय़ा सुस्थितीत आणि मजबूत आहेत का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी करण्याचा निर्णय घेतला असून त्रुटी आढळणाऱ्या बसगाडय़ांचे परवाने रद्द करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.      
ठाणे महापालिकेची परिवहन सेवा ठाणेकरांना दळणवळणाची सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे अनेक ठाणेकर प्रवासी रिक्षाकडे वळले. मात्र रिक्षाचालकांच्या मुजोरशाहीमुळे या प्रवाशांनी आता खासगी बस वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांचा आकडा मोठा असून त्यांच्या या मार्गावर सतत फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे प्रवाशांना वाहतुकीच्या दृष्टिकोनातून चांगली सुविधा मिळू लागली आहे. असे असले तरी या बसचालकांचा मनमानी कारभार प्रवाशांच्या जिवावर बेतू शकतो, असे चित्र सध्या शहरात पाहाव्यास मिळत आहे. ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांची मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे वाहतूक सुरू असते. बसचालक या महामार्गावरील रस्त्याच्या मधोमधच बस थांबवून प्रवाशांना उतरवत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या मार्गावरील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी प्रवाशांना उतरवण्यात येते. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे उड्डाण पुलावर थांबलेल्या वाहनाला पाठीमागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून अपघात होऊ शकतो. तसेच उड्डाण पुलावर उतरविल्यामुळे प्रवाशांना महामार्ग ओलांडावा लागतो. या मार्गावर वाहने भरधाव असतात. त्यामुळे त्यांचा हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो.
दरम्यान, अशा बस चालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली असून महिनाभरात १३७३ बसगाडय़ा चालकांविरोधात कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. या संदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता या बस गाडय़ांविरोधात अनेक तक्रारी आल्या असून त्यानुसार या गाडय़ांविरोधात ही कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात १३७३ गाडय़ांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या बस गाडय़ा सुस्थितीत व मजबूत आहेत का, याची चाचपणी करण्यात येत असून त्यामध्ये त्रुटी आढळणाऱ्या गाडय़ांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. याशिवाय या बसगाडी चालक मालकांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे आणि त्यांच्या गाडय़ांची कागदपत्रे तपासण्याचे आदेश साहाय्यक पोलीस आयुक्तांना दिले आहेत. असेही त्यांनी सांगितले.