लातूर फेस्टिव्हलअंतर्गत पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्या (शुक्रवारी) स्पध्रेतील नाटकांची सांगता आहे. पारितोषिकप्राप्त तीन नाटकांना लातूर फेस्टिव्हलमध्ये शनिवारपासून (दि. १०) पुन्हा आपले नाटक सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
गेल्या २६ डिसेंबरपासून दररोज दोन सत्रांत नाटकांचे सादरीकरण होत आहे. या वर्षी ४० नाटके स्पध्रेत दाखल झाली. लातूरच्या नाटय़रसिकांचा प्रतिसाद पाहून राज्यातील कलाकारांनी समाधान व्यक्त केले. पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे. राज्यभरातून आपापल्या विभागातील पारितोषिकप्राप्त नाटके या स्पध्रेत दाखल होत असतात. कलाकारांची प्रवास ते निवास अशी सर्व व्यवस्था लातूर फेस्टिव्हलमार्फत केली जाते. लातूरच्या रंगभूमीला अधिक बळ मिळावे, या हेतूने ही स्पर्धा घेतली जाते. मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात दररोज ही स्पर्धा होत आहे. नाशिक, ठाणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, पुणे, कल्याण, रत्नागिरी, नांदेड, लांजा आदी ठिकाणांहून नाटय़संस्थांनी आपली नाटके सादर केली.
याच कालावधीत नाटय़ रसिकांसाठी विच्छा माझी पुरी करा, प्रपोजल व हसवाफसवी ही तीन व्यावसायिक नाटकेही लातूरकरांना विनाशुल्क पाहावयास मिळणार आहेत. नाटय़महोत्सव समितीचे समन्वयक बाळकृष्ण धायगुडे गेल्या १५ दिवसांपासून अनिल महाजन, राजा माने, नीलेश सराफ यांच्यासोबत नाटय़महोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. लातूरच्या नाटय़रसिकांना नाटय़महोत्सव ही चांगली संधी लाभली आहे. राज्यातील अनेक प्रायोगिक नाटके पाहण्याची संधी यामुळे प्राप्त झाली आहे. लातूरबरोबरच औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर या भागातील नाटय़ रसिकही हजेरी लावतात.