ज्वारी, बाजरी, रागी, वरई, कोद्रा, आदी भरडधान्याच्या उत्पादन वाढीसाठी व मूल्यवृध्दीसाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असतात. या वर्षी यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीवर ४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकरी गटांना देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे.
शेतकरी गटांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी ४ लाखांपेक्षा अधिक खर्च आला तर तो खर्च शेतकरी गटाने करावा, असे अभिप्रेत आहे. केंद्र शासन पुरस्कृत हैदराबाद येथील राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र या संस्थेने भरड धान्यावर प्रक्रिया करावयास लागणाऱ्या  यंत्रसामुग्रीची तांत्रिक प्रमाणके व मापदंड तयार केले आहेत. अनेकजण गव्हापासून तयार केलेले पदार्थ खाता येत नाही, अशी तक्रार करतात. काही लोक आरोग्याच्या दृष्टीने गव्हाचे पदार्थ खाण्याचे टाळतात. भरड धान्यापासून रवा, चकलीचे पीठ, पापड, शेवया, पोहे, चुरमुरे, इडली पीठ तयार करून त्याची विक्री करतात.
शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट नाबार्ड, धर्मादाय आयुक्त, आत्मा संस्थेकडे नोंदणीकृत असायला हवा. शेतकरी गटाकडे २० बाय २२ फूट आकारमानाचे स्वत:चे बांधकाम असावे व तयार केलेला माल स्वत: विक्री करण्याची यंत्रणा हवी. उद्योगासाठी थ्री फेज वीजजोडणीही आवश्यक आहे. या योजनेसंबंधी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी केले आहे.