विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिटू संलग्न महाराष्ट्र घरेलु कामगार संघटना, जनवादी महिला संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास दिले.
वसुधा कराड, सिंधु शार्दुल, कांतीलाल गरूड, अनिल गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घरेलु कामगार संघटनेच्यावतीने घर कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. घरकामगार कल्याण मंडळासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून नोंदणी व लाभ मिळण्याची प्रक्रिया सुटसुटीत व विनाविलंब करावी, नोंदणी झालेल्यांना त्वरीत ओळखपत्र द्यावे, संबंधितांना जनश्री योजनेचा लाभ द्यावा, सर्व घरकामगार महिलांना २ रुपये किलो दराने ३५ किलो धान्य दरमहा देण्यात यावे, आरोग्य विमा व निवृत्ती वेतन त्वरीत सुरू करावे, मनपाने गरीबांसाठी बांधलेल्या घरातून ३० टक्के घरे घरकामगार महिलांना द्यावी, पहिली ते दहावी तसेच त्यापुढील शिक्षण घेण्यास शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या. जनवादी महिला संघटनेने रोख अनुदान पध्दत रद्द करून नागरिकांना धान्य व घासलेट प्रत्यक्ष द्यावे, इंधन व गॅसची दरवाढ रद्द करावी, रोडरोमिओंचा बंदोबस्त करून अनधिकृत दारू विक्री, गुटखा व व्यसनांच्या अन्य साधनांची विक्री त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. बांधकाम उद्योगातील कामगार मंडळाला स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नोंदणी व लाभ मिळणे ही प्रक्रिया जलदगतिने राबविता येईल, मनपाने गरीबांसाठी बांधलेल्या घरातून तसेच म्हाडा आणि सिडकोमार्फत स्वस्त घरे देण्यात यावी, दिवाळीसाठी २० टक्के बोनस द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे