दारूबंदीची मागणी करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कनगरा गावातील ग्रामस्थांव पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आणि नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या संस्थांनी निषेध केला आहे.
शुक्रवारी हुतात्मा स्मारकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची बैठक झाली. या बैठकीत अनेक मान्यवरांनी कनगरा गावातील घटनेबद्दल रोष प्रकट केला. बचत गटाच्या महिलांचे गावात दारूबंदीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यांनी दारूसाठी पकडून पोलिसांच्या हवाली केली. पोलिसांनी महिलांसमोर दारू जमिनीवर ओतून दिली. त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून लावले. पोलीस व दारु विक्रेते यांनी संगनमताने मध्यरात्री घरामध्ये शिरून ग्रामस्थांना गुरासारखे बडविले. ग्रामस्थांविरूध्दच तक्रार दाखल केल्याची माहिती यावेळी नशाबंदी मंचचे जिल्हाध्यक्ष अविनाश आहेर यांनी दिली. करंजकर, गं. पा. माने, रत्नमाला गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन रमेश भोर यांनी केले. आभार सूर्यकांत आहेर यांनी मानले. मारहाण करणाऱ्या पोलिसांविरूध्द कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून निवेदनावर करंजकर, माने, आहेर, भोर आदींची स्वाक्षरी आहे.