शहरातील स्वच्छतेसह पाणीपुरवठा व अतिक्रमण हटविण्यात आयुक्तांना आलेले अपयश, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव या मुद्दय़ांवर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यावर नाकर्तेपणाचा आरोप करीत सर्वच नगरसेवकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला. केवळ कागद काळे करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज असताना महापालिका प्रशासन निष्क्रिय व ढेपाळले आहे, असा निषेध खुद्द महापौर प्रताप देशमुख यांनीच करून आयुक्तांना धारेवर धरले.
सभेत महापौरांसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आयुक्त शंभरकर यांची कानउघडणी करीत महापालिकेच्या प्रशासनावर कठोर टीका केली. महापौर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सभा सुरू झाली. प्रारंभी नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात होऊन मागील इतिवृत्तास मान्यता देण्याचा ठराव पटलावर ठेवण्यात आला. मात्र, ठरावावर चर्चा होण्याआधीच आयुक्त शंभरकर यांची कार्यपद्धती व सदोष कामाचा आरोप ठेवून नगरसेवकांनी त्यांना फैलावर घेतले. चर्चेत महापौर देशमुख यांनीही आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना जोरदार टीका केली.
शहर विकासाच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या सभेत अनेक महत्त्वपूर्ण ठराव घेतले जातात. परंतु या ठरावानुसार काम होते की नाही हे पाहिले जात नाही. प्रशासनाकडून ठरावाच्या अंमलबजावणीत दिरंगाई केली जाते. महापालिकेतील विभागप्रमुखांकडूनही ठरावाची अंमलबजावणी करण्यास चालढकल केली जाते. महापालिकेत भोंगळ कारभार सुरू आहे. याला सर्वस्वी आयुक्तच जबाबदार आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर नगरसेवकांनी मोर्चा काढला. उपोषण, तोडफोड झाली, तरीही आयुक्तांनी पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. या काळात आयुक्त किती काळ कार्यालयात हजर होते, असे मुद्दे नगरसेवकांनी उपस्थित केले. कर्मचारी ऐकत नसतील तर ते आयुक्तांचे अपयश आहे, अशी टीका करीत सभेत महापौरांसह सर्व नगरसेवकांनी आयुक्तांना फैलावर घेतले.
विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी पाणीपुरवठय़ास टँकर देण्याबाबत मान्यता देण्यात आली. परंतु साधे पाणीवाटपाचे नियोजन व्यवस्थित केले नाही, असा आरोप केला. चर्चेत अतुल सरोदे, उदय देशमुख, सुनील देशमुख, अॅड. जावेद कादर, श्याम खोबे आदींनी भाग घेतला. उपायुक्त दीपक पुजारी विनापरवानगी सभेस गैरहजर राहिल्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नगर अभियंता पवार यांनीही उन्हाळ्यात रजा घेतली, ही बाब चर्चेस आली असता पवार यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. शहरातील पथदिवे देखरेखीचे कंत्राट देण्यात आले. परंतु कंत्राटदाराबाबत अनेक तक्रारी आहेत. हे कंत्राट महिनाभरात काढून घेण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.