बिहारमधील बुद्धगया येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.
या दहशतवादी हल्ल्यात कोणाचा हात आहे हे अजून स्पष्ट झाले नसले, तरी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद येथील कुख्यात दहशतवादी मकबूल सलीम याने आपल्या साथीदारांसह रेकी केल्याचे वृत्त वाहिन्यांवर दाखवले जात आहे. दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळलेला मकबूल सलीम इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. हे सत्य असले, तरी त्याचा पुणे बॉम्बस्फोटात अजून संबंध आढळला नाही. शिवाय त्याने गया येथे रेकी केल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्वच धार्मिक स्थळांची सुरक्षितता वाढविली आहे. या हल्ल्यानंतर सर्वच संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी संयम दाखवत तीव्र निषेध नोंदविला. दहशतवाद्यांचा हल्ला िनदनीय आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच राज्य सरकारांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.
रविवारच्या हल्ल्यानंतर सर्वच धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात येऊन तेथील बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा वस्तूंची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन त्यांनी केले.