यवतमाळ-मूर्तीजापूर या शंकुतला नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि आजही ब्रिटीश कंपनी क्लिक निक्सनच्या ताब्यात असलेल्या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याबाबत सेना खासदार भावना गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता २९ जानेवारीला होणार आहे.
संसदेच्या याचिका समितीसमोर दाखल केलेल्या अर्जासोबत खासदार हंसराज अहीर, खासदार सुभाष वानखडे यांनी देखील खासदार भावना गवळी यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. खासदार अनंत गिते याचिका समितीचे अध्यक्ष आहेत. उल्लेखनीय म्हणजे, यवतमाळ-मूर्तीजापूर शंकुतला रेल्वे तीन महिन्यापासून बंद आहे. ती सुरू व्हावी, यासाठी खासदार भावना गवळी यांनी तिव्र आंदोलन करून यवतमाळ येथे रेल्वे स्थानकावर जाऊन स्टेशन मास्तरच्या कक्षाला कुलूप ठोकले होते. तेव्हा २६ जानेवारीपूर्वी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आणखी महत्वाची बाब अशी की, शंकुतला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावरून वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला.
मात्र त्याचे अर्धवट काम झाले आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि खासदार विजय दर्डा यांनी पाठपुरावा केल्यामुळे तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी यवतमाळात पोस्टल ग्राउंडवर वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाचे उदघाटनही केले होते.