वसई विरार महानगरपालिकेने गतवर्षी बांधलेली सिमेंट काँक्रीटची गटारे निकृष्ट साहित्याच्या वापरामुळे वर्षभरात उघडी पडण्याची तसेच गटारांमध्ये पादचारी पडून जखमी होण्याची किंवा मृत्यू पावण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
संपूर्ण नालासोपारा शहरात सिमेंट काँक्रिटची गटारे वर्षभरापूर्वी बांधण्यात आली. या गटारांवर लाद्या लावल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले. तसेच गटारांवर लोखंडी झाकणे बसविण्यात आली. वर्षभरात लाद्या काही लावल्या गेल्या नाहीत आणि हलक्या पत्र्याची झाकणे लावली गेल्याने आता ती गंजून मोडली आहेत.
गटारांवरील या पदपथांवर रोज मोठी वर्दळ असल्याने व गटारे बांधताना दुय्यम दर्जाचे किंवा कमीत कमी सिमेंट वापरले गेल्याने काँक्रीटचा वरचा थर नष्ट होऊन आता त्याला भगदाडे पडू लागली आहेत. पावसाळ्यापूर्वी या गटारांची दुरुस्ती न झाल्यास अनेक पादचारी फाटक्या गटारांमध्ये कोसळून जखमी किंवा मृत्यू पावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गटारांचीही धूळधाण झाल्याने काही दिवसांत पदपथ नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यातूनच या विधड अवस्थेत असलेल्या पदपथांवर दुकानदारांनी अतिक्रमण केलेले दिसून येते. कपडय़ाच्या दुकानदारांचे अर्धे दुकान पदपथावर, अ‍ॅल्युमिनियमवाले, ग्रीलवाले, धान्याचे दुकानदार, दुधाचे दुकानदार, रस्त्यालगतच्या सर्वच दुकानदारांचा अर्धा माल पदपथांवर ठेवलेला दिसून येतो. पालिकेचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, की त्यांच्या गावी हे नाहीच, असा सवाल संताप पादचारी करीत आहेत. स्नेहांजली ते स्टेशन या भागात तर भाजी, फळविक्रेते, कपडाविक्रेते यांनी सामान्य पादचाऱ्यांना रस्ताच ठेवलेला नाही.