नगर शहर आणि महापालिकेच्या आगामी निवडणुकीकडे श्री. बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन्ही मंत्र्यांचे आणि जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे या तिघांचेही लक्ष नाही, तिघांनीही आगामी निवडणुकीत गांभीर्याने लक्ष घालावे, अशी सूचना काँग्रेसचे संपर्कमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज केली. निधी मिळवण्यासाठी शहरातील काँग्रेसच्या नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कदम यांच्या उपस्थितीत प्रथमच पक्ष कार्यालयात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पक्षाचे थोरात व विखे हे दोन्ही मंत्री उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र अपेक्षेप्रमाणे हे दोघेही मंत्री अनुपस्थित होते.
पक्ष कार्यकर्त्यांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी करत  असल्याचा केला. त्याचा संदर्भ देऊन कदम म्हणाले की, नगर जिल्ह्य़ात विकासापेक्षा राजकारणच अधिक होत आहे हे दुर्दैवी आहे, राज्य सरकार निर्णय घेत असताना जिल्ह्य़ात नियोजन कोठे तरी चुकत असल्याचे दिसते, जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्र्यांना काय चालले हे दिसत नाही का? कार्यकर्त्यांना काही अडचण असल्यास त्यांनी आपल्याला मुंबईत भेटावे किंवा थेट फोन करावा.
जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी जिल्ह्य़ात काम करणे अवघड असल्याची कबुली देताना विशेष कार्यकारी अधिकारी व समित्यांवरील नियुक्तया त्वरित करण्याची मागणी केली. जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीची माहिती त्यांनी दिली. महिला जिल्हाध्यक्ष सुनिता भांगरे यांनी पक्षाच्याच शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष मधुकर नवले यांच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती देत त्यांचा निषेध केला. निरीक्षक आ. शरद रणपिसे यांचेही यावेळी भाषण झाले.
 ‘दोन्ही मंत्र्यांनी निम्मे पैसे द्यावे’
संपर्कमंत्री कदम यांनी लक्ष घातले तर काँग्रेस पक्षाचे भाडय़ाच्या जागेतील कार्यालय स्वमालकीच्या इमारतीत जाईल, असा उल्लेख जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी केला. त्यावर कदम यांनी ससाणे यांना तुम्ही काळजी करु नका, तुमच्या दोन्ही मंत्र्यांना कामाला लावतो, अशा शब्दात आश्वासन दिले. माजी मंत्री म्हस्के यांनी कार्यकर्ते निधी जमा करतील अशी सूचना केली. त्यावर कदम यांनी इमारतीसाठी दोन्ही मंत्री निम्मे-निम्मे पैसे देतील असे सांगताना कार्यालय नसणे पक्षासाठी कमीपणाचे आहे, असा टोलाही लगावला. विशेष कार्यकारी अधिकारी व समित्यांवरील नियुक्तया मंगळवारपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.