‘ही गाडी बोरिवलीला प्लटफॉर्म क्रमांक २ ऐवजी ४ जाईल़  प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत’, अशा सूचना ऐकू येणाऱ्या लोकलमधील कण्र्यातून एकाएकी कुणाच्या तरी आई-माईचा उद्धार करणाऱ्या गलिच्छ शिव्यांचा पाऊस पडला तर? लोकलमधल्या प्रवासात चढता-उतरताना प्रवाशांनी एकमेकांना अथवा सगळ्यांनी मिळून रेल्वे प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहणे नित्याचे असत़े  पण प्रवाशांची ही बोलीभाषा रेल्वेने व्यवहारात आणली की काय, असा प्रश्न पडावा, अशी घटना बुधवारी दुपारी घडली़
 विरारहून चर्चगेटकडे जाणारी ३.३४ ची जलद लोकल दुपारी बोरिवली स्थानकात आली़  मोटरमनच्या लहरीनुसार एखाद्या गाडीत अचानक उद्घोषणा करून ती गाडी कुठे जाणार आहे आणि जलद की धीमी याची माहिती दिली जात़े  तशीच ती या गाडीतही करण्यात आली़  वास्तविक या गाडीचा ना मार्ग बदलला होता, ना प्लॅटफॉर्म क्रमांक, तरीही आले मोटरमनभाऊंच्या मना.. त्यामुळे प्रवाशांना माहिती देण्याच्या नावाखाली या ‘पानखाऊभाऊं’नी फाटक्या गळ्याने आपला खर्जाचा रियाझ करून घेतला़  परंतु खरी गंमत यापुढेच झाली़  उद्घोषणा दिल्यानंतर ध्वनिवर्धक बंद करण्यास हे पानखाऊ महाशय विसरले आणि मग प्रवाशांना पुढची चार-पाच मिनिटे ‘आई-माई उद्धार स्तोत्रा’चे श्रवण करावे लागल़े  कहा गया रे वो ०, उसकी माँ की०, आणि या पेक्षाही खालच्या पातळीवरील अश्राव्य कीर्तन सुरू होत़े  त्यामुळे डब्ब्यातील समपंथी आनंदून गेल़े  त्यांच्या चेहऱ्यावर खुदकन् हासू आल़े  पण आपल्या पती-मुलांसह पुरुषांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांची मात्र कुचंबणा झाली़  त्या बिचाऱ्या तोंडावर पदर-रुमाल घेऊन घृणास्पद नजरेने इतके-तिकडे पाहात होत्या़  तर काही पिकली पानं वर हात करून, काय ही फालतूगिरी.. समजत की नाही यांना.. असे बोल लावत होती़  शेवटी दोन-पाच मिनिटांनी हा प्रकार ‘पानखाऊभाऊं’च्या लक्षात आला़  त्यांनी ध्वनिवर्धक बंद करण्याची कृपा प्रवाशांवर केली आणि एकदाचे हे प्रकरण आटोपल़े