विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्याची जोरदार मोहीम मध्य रेल्वे प्रशासनाने राबविली असून या फुकटय़ा प्रवाशांकडून केलेल्या दंडवसुलीमुळे मध्य रेल्वेला काही हजार, लाख नव्हे तर चक्क कोटय़वधी रुपयांची कमाई झाली आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०१३ या कालावधीत विनातिकीट तसेच लांब पल्ल्ल्यांच्या गाडय़ांमधून विनाआरक्षित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेला दंडापोटी सुमारे ९० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.  
विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५ लाख ८८ हजार प्रवाशांकडून २० कोटी ८२ लाख रुपये तर लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्येही आरक्षण न करता आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या १४ लाख ७२ हजार प्रवाशांकडून ६८ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२०१२ या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विनातिकीट प्रवाशांची ही संख्या ४ लाख ९७ हजार होती. त्यावेळी प्रवाशांकडून १६ कोटी ७९ लाख रुपये वसुल करण्यात आले होते.
या दोन्ही प्रकारच्या प्रवाशांमध्ये १०.७ टक्के वाढ झाली असून रेल्वेच्या महसुलातही १६.६ टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे.