इतवारी येथे आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना फरार घोषित करण्यात आले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी स्थापन केलेल्या विशेष कृती पथकाचे निरीक्षक बी.एन. सिंह यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गेल्या २२ जून रोजी तिरोडा रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्रात छापा मारला होता. यावेळी तिरोडा येथील राकेश जनबंधू (२३) आणि कुणाल उईके (२४) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध रेल्वे अधिनियमाखाली गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांची तीन दिवसांची पोलीस कोठडीही घेण्यात आली.
चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या गुन्ह्य़ातील काही मुख्य दलालांना पकडण्यासाठी प्रयत्न केले, परंतु हे आरोपी फरार आहेत. पकडलेल्या दोघांना २५ जूनला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. त्यांनी आठवडय़ातून दोन दिवस गोंदिया येथील आरपीएफ ठाण्यात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे. दरम्यान, शहजाद खान उर्फ पल्की आणि अभिषेक जैन उर्फ सनी या दोन मुख्य दलालांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन घेण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आहे.