मनसेच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे रस्ते खोळंबतील या विचाराने रेल्वेची वाट धरणाऱ्या शेकडो प्रवाशांवर बुधवारी नसती आफत ओढवली. ऐन गर्दीच्या वेळेत ठाणे आणि मुलुंडदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि लोकल गाडय़ा ठाण्यातच अडकून पडल्या. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अधिक तयारीत असणे गरजेचे होते. तसे काहीच दिसले नाही. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत लोकलच्या झालेल्या खोळंब्यामुळे प्रवाशांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली.
मध्य रेल्वे मार्गावर रुळांना तडा जाण्याच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. बुधवारी सकाळी राज ठाकरे यांचे आंदोलन होणार असल्याने रस्ते वाहतुकीऐवजी अनेकांनी कार्यालयात जाण्यासाठी मध्य रेल्वेचा पर्याय निवडला. मात्र सकाळी ९.२५ वाजता ठाण्याहून मुलुंडकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली आणि मध्य रेल्वेचा पुरता खोळंबा झाला. त्यामुळे ठाणे स्थानकात लोकल खोळंबल्या आणि स्थानकात मोठी गर्दी उसळली. यावेळी रेल्वेच्या ब्रिजवर चेंगराचेंगरीचाही प्रकार घडला. सुदैवाने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती मिळताच रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सकाळी १० वाजता रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. तोपर्यंत सुमारे ३५ मिनिटे या भागातील वाहतूक खोंळबली होती. मुंबईकडे निघालेल्या दोन लोकल सुमारे ३५ मिनिटे या मार्गावर अडकून पडल्या होत्या. त्यातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अंबरनाथकडे जाणारी लोकल ठाणे स्थानकात रद्द करण्यात आली तर ठाणे स्थानकातून सीएसटीकडे जाणारी एक लोकल रद्द करून ती कारशेडमध्ये पाठवण्यात आली. त्यामुळे वाढलेली गर्दी आणि रद्द होणाऱ्या लोकल असे चित्र ठाणे स्थानकात निर्माण झाले होते.

वाहतूक सुरळीत..
तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक ३५ मिनिटे उशिरा सुरू होती. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली. केवळ दोन लोकल खोळंबल्या होत्या. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना मार्गस्थ करण्यात आले. कोणतीही लोकल रद्द करण्यात आली नव्हती. मार्ग बदलल्यामुळे थोडा खोळंबा झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
नेहमीप्रमाणे ‘मरे’ अपयशी..
उपनगरांची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकलसेवेने देखभाल दुरुस्तीच्या आभावामुळे पुन्हा एकदा मान टाकली. रेल्वेवर विसंबलेल्या प्रवाशांना रेल्वेने दगा दिल्याचे चित्र दिसून आले. ठाण्यापलीकडील प्रवाशांना ठाण्यापुढे जाण्याचा मार्गच रेल्वेने बंद करून टाकला होता. त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात कमालीची वाढ झाली होती. रेल्वेने आपले अपयश पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी महासंघाचे जितेंद्र विशे यांनी व्यक्त केली.