रविवारी रात्रीपासून मराठवाडय़ाच्या विविध भागांत पडणाऱ्या पावसाच्या सरी मंगळवारी रात्री बऱ्याच ठिकाणी मुक्कामी आल्या. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत जोरदार पाऊस झाला. दुष्काळी जालना जिल्ह्य़ाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. शुष्क जमिनीवर पडलेल्या पावसाच्या सरी जिरून गेल्या. त्यामुळे दिवसभर कमालीचा उकाडा होता. शेतकरी बी-बियाणे जुळविण्याच्या तयारीला लागला आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ात गंगापूरवगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये थोडय़ा-बहुत प्रमाणात सोमवारी रात्री व मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्य़ातही सर्वदूर पाऊस झाला. रात्री मोठा पाऊस झाल्याने मंगळवारी दिवसभर ठिबकचे पाइप अंथरण्याचे काम फळबाग उत्पादकांनी नव्याने सुरू केले. जिल्ह्य़ातील काही फळबागा पूर्णत: जळण्याच्या मार्गावर होत्या. एखादा पाऊस मिळाला तर काही झाडे जगू शकली असती. ज्यांनी फळबाग टिकविण्यासाठी बरीच मेहनत घेतली, त्यांना पावसाने दिलासा दिला. पाऊस झाल्याने काही भागात वखरणीला सुरुवात झाली. तालुक्याच्या गावी जाऊन खत आणि बियाणे घेण्याची एकच घाई सुरू आहे.
जिल्ह्य़ात कापसाचे पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला. तसेच खतही बांधावर देण्याच्या योजनेला प्रशासनाने गती दिली. जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत गंगापूरवगळता अन्य तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. सर्व आकडे मिमीमध्ये – औरंगाबाद (६), फुलंब्री (१६.५०), पैठण (९.७०), सिल्लोड (२०.१०), सोयगाव (२२.७०), कन्नड (१०.८१), वैजापूर (६.३०), गंगापूर (०.३०), खुलताबाद (१२.३०). एकूण १०४.७१ मिमी पाऊस नोंदविला गेला. जालना जिल्ह्य़ातही सर्वदूर पाऊस झाला. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे- जालना (१२.७५), बदनापूर (१२.४०), भोकरदन (२४.७५), जाफराबाद (२२), परतूर (५.४०), मंठा (२), अंबड (१५), घनसावंगी (७.५७).