मराठवाडय़ात सर्वत्र गणेशविसर्जनाच्या दिवशी परतीचा दमदार पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट बऱ्यापैकी दूर होईल, अशी आशा बळावली आहे. विसर्जनाच्या दिवशी दीड-दोन तास पावसाने जोरदार बरसात केली. हिंगोली व उस्मानाबाद येथे गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.
गणेशचतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज पावसाने हजेरी लावल्याने अपेक्षित सरासरी गाठली गेली. एकूण सरासरीच्या टक्केवारीतही वाढ झाली. तथापि, उस्मानाबाद, आष्टी, पाटोदा भागात अजूनही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पाणीटंचाईचे संकट पूर्णत: टळले नाही. औरंगाबादच्या गंगापूर व सोयगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला. विसर्जन मिरवणुकीदरम्यानही पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातील नागमठाणला सर्वाधिक ४६ मिमी नोंद झाली. औरंगाबाद तालुक्यात ११, फुलंब्री ९.८०, पैठण १६.४०, सोयगाव २३.७०, कन्नड १६.१०, वैजापूर १६.५०, गंगापूर २०.९०, खुलताबाद ७.७० मिमी नोंद झाली. चालू वर्षांच्या वार्षिक सरासरीत ८७ टक्के, तर अपेक्षित सरासरीच्या १०३ टक्के पाऊस झाला. ऊध्र्व गोदावरीतही पाऊस झाल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीतही वाढ होईल. आजपर्यंत पडलेला पाऊस व अपेक्षित सरासरी याची टक्केवारी काढली असता उस्मानाबादवगळता अन्य सर्व जिल्ह्य़ांमध्ये ती १०० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे.
परभणीत सरासरी ओलांडली
परभणी – जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसाने यंदा सुखद चित्र तयार झाले असून या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसाने वार्षकि सरासरीचा टप्पा पार केला. बुधवारी रात्रीपर्यंत सरासरीच्या ९८.२९ टक्के पाऊस झाला. गुरुवारी सकाळीही पावसाचा जोर होताच. त्यामुळे यंदा पावसाने वार्षकि सरासरी गाठली आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर प्रचंड होता. सलग ३ तास पावसाने झोडपले. या पावसाचा परिणाम गणेशविसर्जन मिरवणुकांवरही झाला. पडत्या पावसातच सर्व गणेश भक्तांनी गणरायांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात निरोप दिला.
जिल्ह्यात पावसाअभावी संकटात सापडलेल्या पिकांना आता चांगलाच दिलासा मिळाला असून कापूस, सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. जिल्ह्याची वार्षकि सरासरी ७४४.५९ आहे. जून ते ऑक्टोबर महिन्यांत पडणारा पाऊस गृहीत धरून ही सरासरी काढली आहे. या वर्षी सुरुवातीपासूनच पाऊस समाधानकारक झाल्याने जिल्ह्यातल्या लघु व मध्यम सिंचन प्रकल्पांची स्थितीही चांगली आहे. जिल्ह्यात सध्या पीकस्थिती समाधानकारक असून पावसाने सरासरीचा टप्पा गाठल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये झालेला पाऊस मिमीमध्ये : परभणी ६७३.०५, पालम ५८१.३९, पूर्णा ९३१.६५, गंगाखेड ६८५.५, सोनपेठ ९४९, सेलू ७७५.०७, पाथरी ८८१.३३, जिंतूर ७४९.८८, मानवत ६२४.५६. जिल्ह्यात आतापर्यंत ७६१.३६ मिमी पाऊस झाला.
जालन्यातही सरासरीच्या पुढे
जालना – गुरुवारी सायंकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे चालू वर्षांतील अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली. जिल्ह्य़ाची पावसाची अपेक्षित वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून आतापर्यंत त्यापेक्षा अधिक पाऊस जिल्ह्य़ात झाला. मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणात उपस्थिती लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्य़ात सरासरी १५ मिमी  पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ८१३.३५ मिमी नोंद आतापर्यंत झाली. त्याखालोखाल जालना तालुक्यात ७१८.०३ मिमी पाऊस झाला. अन्य तालुक्यांतील आतापर्यंतचा पाऊस मिमीमध्ये : भोकरदन ६६२.५३, बदनापूर ५११.०८, परतूर ८३१.०६, अंबड ६४७.२५, घनसावंगी ४३४.३१ व मंठा ७६५.२५.
वीज पडून शेतकरी ठार
हिंगोली – जिल्ह्य़ात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील ढेगज गाव शिवारात वीज पडून रमेश निवृत्ती जाधव (वय २८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी नंदाबाई जाधव जखमी झाली. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात पाऊस आल्याने जिल्ह्य़ाची वार्षिक सरासरी ११७.६१ टक्के एवढी नोंदविण्यात आली आहे. खरीप पिकाला या पावसाचा लाभ होईल, असे कृषी विभागातील अधिकारी सांगतात.