दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला अत्यावश्यक ठरणाऱ्या झेंडू फुलांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, एक दिवसाच्या बाजारात झेंडूचे दर शंभरी पार करतील असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. व्यापारीवर्गही शेतात जाऊन झेंडूचा दर निश्चित करीत आहेत.
दसरा-दिवाळीच्या सणासाठी झेंडूची मोठय़ा प्रमाणात मागणी असते. हे लक्षात घेऊन गेल्या आठ-दहा वर्षांत मिरज तालुक्याच्या पूर्व भागात आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मोठय़ा प्रमाणात झेंडूची लागवड केली जात आहे. या ठिकाणी गेंदेदार झेंडूसाठी एॅरोगोल्ड आणि लहान फुलांसाठी कलकत्ता या दोन जातींची लागण शेतकऱ्यांकडून होत आहे. जिराईत व बागाईत क्षेत्रासाठी तीन महिन्यांत नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणून फुलांची लागण वाढली आहे.
शनिवारपासून जिल्हय़ात परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. शनिवारी तर दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने मिरज तालुक्यात २४ तासांत १३७ मि.मी. पावसाची नोंद करीत धुमाकूळ घातला. यामुळे फुललेल्या झेंडू फुलात पाणी साचले. झेंडू फुलात पाणी साचल्याने झाडांच्या फांद्या वाकल्या आहेत. त्याचबरोबर नवीन कळीला फूल उमलण्यास विलंब होत आहे. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस सलग तीन दिवस हजेरी लावत होता. त्यामुळे साठलेल्या पाण्याने फुले कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली. परिणामी, फूल उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. याचे परिणाम दर वाढण्यात होण्याची शक्यता उत्पादक व्यक्त करीत आहेत.
बहुसंख्य फूल उत्पादक शेतकरी फुलांच्या विक्रीसाठी स्वत: शहरांकडे धाव घेत असतो. मात्र चालू वर्षी लक्ष्मीपूजेच्या फुलांसाठी विक्रेतेच शेतकऱ्यांच्या शेताकडे धाव घेऊ लागले आहेत. एकरी ३० हजार ते ५० हजार रुपये मोजण्याची व्यापाऱ्यांची तयारी दिसत असून, त्याचे परिणाम किरकोळ विक्रीचा दर शंभरीच्या पुढे किलोला जाण्याचा संभव व्यक्त होत आहे.